तहसीलदारांसह तिघा जणांना अटकपूर्व जामीन
आत्महत्या प्रकरणाच्या तपासाला मिळणार गती
बेळगाव : तहसीलदार कार्यालयातील अधिकाऱ्याच्या आत्महत्या प्रकरणी फरारी असलेल्या तहसीलदारांसह तिघा जणांना गुरुवारी न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. आत्महत्येच्या घटनेनंतर 10 दिवसांनी त्यांना दिलासा मिळाला आहे. आता या प्रकरणाच्या तपासाला चालना मिळणार आहे. रुद्राण्णा यडवण्णवर (वय 34) या अधिकाऱ्याने मंगळवार दि. 5 नोव्हेंबर रोजी सकाळी तहसीलदार कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यासंबंधी रुद्राण्णाची आई मल्लव्वा दुंडाप्पा यडवण्णवर यांनी खडेबाजार पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. आपल्या मुलाच्या आत्महत्येला तहसीलदारांसह तिघेजण जबाबदार असल्याचे त्यांनी फिर्यादित म्हटले होते.
रुद्राण्णानेही आत्महत्या करण्यापूर्वी तहसीलदार ऑफीस ऑल स्टॉफ या व्हॉट्सअॅप ग्रुपवर मॅसेज करून आपल्या मृत्यूला तहसीलदार बसवराज नागराळ, सोमू व अशोक कब्बलिगेर हे तिघेजण जबाबदार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे खडेबाजार पोलीस स्थानकात तहसीलदारांसह तिघा जणांवर एफआयआर दाखल करण्यात आले होते. गुरुवारी येथील दहावे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने तिन्ही संशयितांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. खडेबाजारचे एसीपी शेखरप्पा एच., पोलीस निरीक्षक श्रीशैल गाबी आदी अधिकारी याप्रकरणी तपास करीत आहेत.