महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

प्रवीण कुमारची रेकॉर्डब्रेक उंच उडी

06:58 AM Sep 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारताला मिळवून दिले सहावे सुवर्णपदक : 2.08 मीटर उडीसह नवा आशियाई विक्रम

Advertisement

वृत्तसंस्था/ पॅरिस

Advertisement

भारतीय पॅरा अॅथलीट प्रवीण कुमारने पॅरिस पॅरालिम्पिकच्या पुरुषांच्या उंच उडी टी 64 स्पर्धेत नव्या आशियाई विक्रमासह सुवर्णपदक जिंकले. लहान पायांसह जन्मलेल्या प्रवीणने सहा खेळाडूंमध्ये हंगामातील सर्वोत्तम 2.08 मीटर उडी मारली आणि अव्वलस्थान पटकावले. विशेष म्हणजे प्रवीण कुमार हा पॅरालिम्पिकमध्ये उंच उडीत सुवर्ण जिंकणारा मरियप्पन थंगावेलू नंतर दुसरा भारतीय ठरला. दरम्यान, पॅरालिम्पिकमधील भारताचे हे एकूण 26 वे पदक आहे, तर हे सहावे सुवर्ण आहे. प्रवीणचे पॅरालिम्पिकमधील हे सलग दुसरे पदक आहे. यापूर्वी, त्याने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले होते.

उंच उडीच्या टी 64 इव्हेंटमधील फायनलमध्ये प्रवीणने अमेरिका आणि उझबेकिस्तानच्या पॅरा ऍथलीट्सचा पराभव केला. प्रवीणने 2.08 मीटर उंच उडी मारली, तर अमेरिकन पॅरा अॅथलीट डेरेक लोकिडेंटने 2.06 मीटर उंच उडी मारून रौप्यपदक जिंकले. उझबेकिस्तानच्या तेमुरबेक गियाझोव्हने 2.03 मीटर उडी मारून कांस्यपदक जिंकण्यात यश मिळविले. खराब सुरुवात झाल्यामुळे प्रवीण सुरुवातीला पिछाडीवर होता, पण नंतर त्याने जबरदस्त पुनरागमन केले व यशाला गवसणी घातली. जन्मत: अपंग असलेल्या प्रविणला बालपणापासूनच खेळाची आवड होती. प्रवीणची आवड जोपासत वडिलांनी त्याला सपोर्ट केला. प्रवीणही गुगलच्या माध्यमातून नवनव्या खेळाची सतत माहिती घेत असे. याचा त्याला चांगलाच फायदा झाला. पुढे चंदीगड येथे प्रशिक्षण घेत उंच उडीत त्याने देशाचे नाव रोषण केले आहे.

उंच उडीत भारताचे दुसरे सुवर्ण

पॅरालिम्पिक स्पर्धेत आतापर्यंत उंच उडीमध्ये यापूर्वी मरियप्पन थंगावेलू याने सुवर्णपदक जिंकले होते. यानंतर आता सुवर्णपदक पदक जिंकणारा प्रवीण कुमार हा दुसरा भारतीय ठरला आहे. टोकियो येथील स्पर्धेत प्रवीणने रौप्य जिंकले होते यंदा मात्र सरस कामगिरी करत सुवर्ण जिंकण्याची किमया केली आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या स्पर्धेत उंच उडीत भारताने तीन पदके जिंकली आहेत. शरद कुमारने टी 63 प्रकारात रौप्य, मरियप्पनने कांस्यपदक जिंकले आहे. प्रवीणने टी 64 प्रकारात गोल्ड मिळवले आहे.

  भारताच्या झोळीत आतापर्यंत 26 पदके

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताला आतापर्यंत 26 पदके जिंकण्यात यश मिळवले आहे. यात प्रवीण कुमारने उंच उडीत पटकावलेले भारताचे हे सहावे सुवर्णपदक आहे. अवनी लखेरा, नितेश कुमार, सुमित अंतिल, हरविंदर सिंग, धरमबीर यांनी पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदके जिंकली आहेत.

ज्युदोच्या इतिहासात भारताला पहिलेच पदक, कपिल परमारला कांस्य

कपिल परमारने भारताला पॅरालिम्पिक स्पर्धेत ज्युदोतील ऐतिहासिक पदक जिंकून दिले. त्याने पुरुषांच्या 60 किलो वजनी गटाच्या जे1 प्रकारात ब्राझीलच्या डी ऑलिव्हिएरचा 10-0 असा पराभव करत कांस्यपदकाला गवसणी घातली. विशेष म्हणजे, ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात भारताला ज्युदोत आतापर्यंत एकही पदक जिंकता आले नव्हते. हा पराक्रम कपिलने करुन दाखवला आहे. कपिल परमारने केवळ 33 सेकंदात इपॉन नोंदवत लढत संपवून कांस्य मिळविले. उपांत्य फेरीत कपिलला इराणच्या बनिताबा खुर्रम अबादीकडून 0-10 असा पराभव पत्करावा लागल्यानंतर त्याला कांस्यपदकाच्या लढतीत खेळावे लागले. कपिल हा मध्यप्रदेशमधील शिवोर या लहानशा खेड्यातील रहिवासी आहे.  गावातील शेतात खेळत असताना चुकून त्याचा पाण्याच्या विद्युत पंपाला स्पर्श झाला. त्यामुळे त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. यानंतर बेशुद्ध झालेल्या परमारला रुग्णालयात नेण्यात आले आणि सहा महिने तो कोमात राहिला. या अपघातानंतरही कपिलने हार मानली नाही आणि ज्युदोमध्ये यश मिळवले. आजवर कपिलने अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदके मिळवली आहेत. आता, पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकत त्याने इतिहास रचला आहे. कपिलच्या या शानदार कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

एक अतिशय संस्मरणीय कामगिरी आणि एक विशेष पदक. कपिल परमार पॅरालिम्पिक स्पर्धेतील ज्युडोमध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय ठरल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. संपूर्ण देशवासियांना आपला अभिमान आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article