हेरवाडकर स्कूल-टिळकवाडी विभागातर्फे प्रतिभा कारंजी स्पर्धा उत्साहात
बेळगाव : एम. व्ही. हेरवाडकर स्कूल व बेळगाव शहर टिळकवाडी विभाग यांच्यावतीने प्रतिभा कारंजी स्पर्धा उत्साहात पार पडल्या. प्रमुख पाहुण्या म्हणून उपमहापौर वाणी जोशी, बीआरसीचे आय. डी. हिरेमठ, वंदना बर्गे, प्राचार्या शोभा कुलकर्णी, असिफ अत्तार, आर. व्ही. हैबत्ती, वरदा फडके, अरुण पाटील आदी उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणामध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धेचे महत्त्व सांगून सांस्कृतिक महोत्सवाचा फायदा, शालेय जीवनात त्याचे महत्त्व याबद्दल मार्गदर्शन केले. यानंतर चित्रकला, प्रश्नमंजुषा, नाटक, गायन, रांगोळी, पाठांतर, स्तोत्र पठण, वेशभूषा, कथाकथन, चित्रकला, निबंध लेखन, काव्यवाचन, अभिनय, लोकगीते, लोकनृत्य, क्ले मॉडेलिंग, पीक अँड स्पीक आदी स्पर्धा घेण्यात आल्या. सूत्रसंचालन वृंदा जोशी यांनी केले. सुरेखा धामणेकर यांनी आभार मानले.