हलशी कुस्ती मैदानात प्रथमेश कंग्राळी विजेता
श्री नृसिंह लक्ष्मी वराह यात्रेनिमित्त लहान-मोठ्या अनेक आकर्षक कुस्त्यांचे आयोजन, कुस्तीशौकिनांची मोठी उपस्थिती
वार्ताहर /नंदगड
हलशी येथील श्री नृसिंह लक्ष्मी वराह यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती प्रथमेश हट्टीकर कंग्राळी विरुद्ध श्रवण कक्केरी यांच्यात लागली होती. अवघ्या तीन मिनिटात प्रथमेश हट्टीकर कंग्राळी याने एकलांगी डावावर आकर्षक विजय मिळविला. प्रथम क्रमांकाची कुस्ती सायंकाळी 6.32 वाजता आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते लावण्यात आली. यावेळी लैला शुगरचे कार्यकारी संचालक सदानंद पाटील, भरमाणी पाटील, मल्लापा मारिहाळ, यात्रा कुस्ती संघटनेचे अर्जुन देसाई, प्रल्हाद कदम, शिवाजी भातकांडे, पांडुरंग बावकर, संजय हलगेकर, सुभाष गुरव, नारायण जोगन्नावर, प्रदीप पारिपत्तेदार, राजू मादार, मयूर गुरव, परशराम मादार, दिनेश गुरव, विलास देसाई, दिनेश देसाई, अनंत देसाई, शिवाजी कदम आदींसह यात्रा कमिटीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. आखाड्याचे उद्घाटन माजी आमदार अरविंद पाटील यांच्या हस्ते झाले.
या आखाड्यात रोहित माचीगड, शंकर तीर्थकुंडे, विनायक येळ्ळूर, महेश तीर्थकुंडे, रामलिंग आलारवाड आदींसह अनेक लहान-मोठ्या कुस्ती पैलवानांनी विजय मिळवून प्रेक्षकांची वाहव्वा मिळवली. या आखाड्यातील पाच कुस्त्या बरोबरीत सोडविण्यात आल्या. आखाड्यात महिलांच्या तीन कुस्त्या लावण्यात आल्या. महिलांमधील तनुजा गुरव खानापूर विऊद्ध भक्ती गावडा मोदेकोप यांची कुस्ती आकर्षक ठरली. शेवटी ही कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली. पंच म्हणून पांडुरंग पाटील, मलकाजी पाटील, कलाप्पा पाटील, मंजुनाथ कक्केरी, शिवाजी भातकांडे आदींनी काम पाहिले. कुस्त्यांचे समालोचन सुहास पाटील, अर्जुन देसाई, मयूर गुरव यांनी केले. आखाड्यासाठी खानापूर तालुक्याच्या विविध गावातून मोठ्या प्रमाणात कुस्तीशौकीन उपस्थित होते. या भागात गेला आठवड्याभर रोजच पाऊस पडत होता. पण यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कुस्ती आखाड्याच्या वेळी पाऊस पडला नसल्याने कुस्त्या व्यवस्थित झाल्याबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले.