प्रथमेश हट्टीकरने मारले कडोलीचे मैदान
वार्ताहर/कडोली
कडोली कुस्तीगिर संघटना आणि ग्रामस्थ यांच्या विद्यमाने रविवारी झालेल्या कुस्ती मैदानात लहान कंग्राळीचा मल्ल प्रथमेश हट्टीकरने प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत दर्गा तालमीच्या गौस कुंदरगीला केवळ 5 मिनिटात आकडी डावावर चारीमुंड्या चीत केले. सालाबादप्रमाणे गुढीपाडव्यानिमित्त कडोली कुस्तीगिर संघटनेच्यावतीने श्री बसवाणा मंदिराजवळील आखाड्यामध्ये हे मैदान आयोजित केले होते. या मैदानाचे उद्घाटन निवृत्त शिक्षक भरतकुमार भोसले यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. श्रीपती पाटील, लक्ष्मण रुटकुटे, लक्ष्मण पुजारी (रायबाग) यांच्या हस्ते विविध फोटोंचे पूजन आणि आखाड्याचे पूजन करण्यात आले.
प्रथमेश हट्टीकर आणि गौस कुंदरगी यांच्यातील पहिल्या क्रमांकाची कुस्ती सुधीर पाटील आणि कुस्तीगिर संघटनेच्यावतीने लावण्यात आली. या लढतीमध्ये प्रथमेश हट्टीकरने सुरुवातीपासूनच गौस कुंदरगीवर आपली पकड ठेवली होती. डाव प्रतिडाव यामुळे ही कुस्ती अधिकच रंगतदार झाली. दोन्ही पैलवानांनी परस्परांच्या ताकदीचा अंदाज घेतल्यानंतर प्रथमेशने पाचव्या मिनिटालाच आकडी डावावर गौस कुंदरगीला चारीमुंड्या चीत केले. या कुस्तीवेळी शिवाजी पाटील आणि वसंत पावले यांनी पंच म्हणून कामगिरी केली.
लहान मुलांच्या चटकदार लढतींमध्ये अरल पाटील, अथर्व कासार, शिवराज कंग्राळी, सुशांत कडोली यांनी शानदार विजय मिळविले. मेंढ्यासाठीच्या झालेल्या लढतीमध्ये सुमीत कडोली यांनी झोळी डावावर विनायक येळ्ळूरचा पराभव केला. या विजयामुळे सुमीत कडोली मेंढा बक्षीसाचा मानकरी ठरला. ही कुस्ती 25 मिनिटे चालली होती. या कुस्तीसाठी भाऊ पाटील यांनी पंच म्हणून काम पाहिले. विद्यमान ग्रामपंचायत सदस्या रेखा कल्लाप्पा नरोटी यांच्यावतीने विजेत्या पैलवानाला मेंढा हे बक्षीस ठेवण्यात आले होते. या मैदानात यशवंत कुट्रे, प्रभाकर बाळेकुंद्री, राजू पाटील, सिद्राय मुतगेकर, जोतिबा पाटील, शशिकांत कोरे, सागर बाळेकुंद्री, प्रशांत पाटील आणि नाना पाटील यांनी पंच म्हणून काम पाहिले. श्रीपती पाटील आणि लक्ष्मण रुटकुटे यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.