सैन्य भरतीसाठी आलेल्या तरुणांना लाठीचा प्रसाद
बेळगावात भरतीच्या ठिकाणी प्रचंड गर्दी झाल्याने हुल्लडबाजी : बेशिस्त वागल्याने कारवाई
बेळगाव : प्रादेशिक सेनेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सैन्य भरती मेळाव्यासाठी रविवारी हजारो तरुण बेळगावमध्ये आले होते. भरतीच्या ठिकाणी प्रचंड गर्दी झाल्याने काही तरुणांनी हुल्लडबाजी सुरू केली. या तरुणांना नियंत्रणात आणण्यासाठी अखेर सेनेचे जवान तसेच पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. हुल्लडबाजांसोबत इतर तरुणांनाही पोलिसांच्या लाठीचा प्रसाद खावा लागला. मागील आठवडाभरापासून भरती प्रक्रिया सुरू आहे. रविवारी बेळगावसह उत्तर कर्नाटकातील बागलकोट, धारवाड, कलबुर्गी, कोप्पळ, रायचूर, गदग, हावेरी, बळ्ळारी, बिदर, विजापूर, विजयनगर, दक्षिण कन्नडा, उत्तर कन्नडा, उडुपी व यादगिर या जिल्ह्यांसाठी राखीव भरती होती. मागील दोन दिवसांपासून उत्तर कर्नाटकातील तरुण मोठ्या संख्येने भरतीसाठी बेळगावमध्ये आले होते. रेल्वे, बस तसेच इतर साधनांनी तरुण बेळगावमध्ये दाखल झाले आहेत.
भरतीच्या ठिकाणी चेंगराचेंगरी
रविवारी पहाटेपासून भरती प्रक्रियेला सुरुवात झाली. हजारो विद्यार्थी क्लब रोड, शौर्य चौक, गणेशपूर रोड या परिसरात दाखल झाले होते. ज्या ठिकाणी भरतीसाठी विद्यार्थी सोडले जात होते, तेथे मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी सुरू झाली. युवकांची हुल्लडबाजी सुरू झाल्याने त्यांना रोखणे गरजेचे होते. अनेकवेळा सूचना करून देखील काही तरुण ऐकण्यास तयार नसल्याने अखेर जवान तसेच पोलिसांनी भरतीसाठी आलेल्या युवकांवर सौम्य लाठीचार्ज केला.
पोलिसांकडून सूचना करूनही हुल्लडबाजी
युवकांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून सूचना केल्या जात होत्या. परंतु, काही तरुण पोलिसांनाच उलट उत्तरे देत होते. खाली बसा असे सांगून देखील काही जण मुद्दामहून ढकलाढकली करण्याचा प्रयत्न करीत होते. यामुळे इतर तरुणांनाही या हुल्लडबाजांचा फटका बसत होता. यामुळे पोलिसांनाही तरुणाईला आवरताना नाकीनऊ झाली.