प्रणॉय पराभूत, किरण जॉर्ज विजयी
वृत्तसंस्था / निंगबो (चीन)
येथे सुरू असलेल्या आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचा पुरुष बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयचे एकेरीतील आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. पण भारताच्या किरण जॉर्जने एकेरीची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. दरम्यान महिला एकेरीत भारताच्या आकर्षी काश्यप आणि अनुपमा उपाध्याय यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात चीनच्या झु ग्युयांग लु याने प्रणॉयचा 21-16, 12-21, 21-11 अशा गेम्समध्ये पराभव केला. हा सामना 70 मिनिटे चालला होता. अन्य एका सामन्यात भारताच्या किरण जॉर्जने कझाकस्थानच्या डिमीट्री पेनारीनचा केवळ 35 मिनिटांत 21-16, 21-8 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले.
महिला एकेरीत चीनच्या हेन युईने भारताच्या आकर्षी काश्यपचा 21-13, 21-7 अशा गेम्समध्ये 31 मिनिटांच्या कालावधीत पराभव करत पुढील फेरी गाठली. थायलंडच्या इंटेनॉनने अनुपमा उपाध्यायवर 21-13, 21-14 अशी मात केली. महिला दुहेरीत चीन तैपेईच्या संघ आणि यु यांनी भारताच्या के. प्रिया व श्रुती मिश्रा यांचा पहिल्याच फेरीत 21-11, 21-13 असा पराभव केला. पुरुष दुहेरीत भारताच्या हरिहरन व रुबेनकुमार यांनी लंकेच्या मधूका व लाहीरु यांचा 21-3, 21-12 असा पराभव करत विजयी सलामी दिली. भारताच्या पृथ्वी रॉय आणि साई प्रतिक यांचे पुरुष दुहेरीतील आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले.