प्रणॉय, आयुष, तरुण दुसऱ्या फेरीत
ऑस्ट्रेलिया ओपन सुपर 500 बॅडमिंटन : किरण जॉर्ज पहिल्या फेरीत पराभूत
वृत्तसंस्था/सिडनी, ऑस्ट्रेलिया
एचएस प्रणॉय, आयुष शेट्टी व तरुण मन्नेपल्ली या भारतीय बॅडमिंटनपटूंनी शानदार प्रदर्शन करीत येथे सुरू असलेल्या ऑस्ट्रेलिया ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सुरुवात केली. 2023 मध्ये या स्पर्धेचा उपविजेता असणाऱ्या प्रणॉयने पहिला गेम सहजपणे गमविल्यानंतर नंतरच्या गेम्समध्ये जोरदार मुसंडी मारत जागतिक क्रमवारीत 85 व्या स्थानावर असणाऱ्या योहानेस सौत मार्सेलीनेवर 6-21, 21-12, 21-17 असा 57 मिनिटांच्या खेळात मात केली. 33 वर्षीय प्रणॉयची पुढील लढत इंडोनेशियाच्या आठव्या मानांकित अल्वी फरहानशी होईल.
जागतिक क्रमवारीत 32 व्या स्थानावर असणाऱ्या 20 वर्षीय आयुष शेट्टीने या वर्षीच्या सुरुवातीला यूएस ओपन स्पर्धा जिंकून पहिली सुपर 300 स्पर्धा जिंकली होती. येथे त्याने कॅनडाच्या सॅम युआनला 21-11, 21-15 असा 33 मिनिटांच्या खेळात पराभूत केले. त्याची पुढील लढत चौथा मानांकित जपानचा कोदाय नाराओका व कॅनडाचा झियाडाँग शेंग यापैकी एकाशी होईल. आयुषने 2023 मधील वर्ल्ड ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक मिळविले होते.
यावर्षी झालेल्या मकाऊ ओपन स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारलेल्या तरुण मन्नेपल्लीने डेन्मार्कच्या मॅग्नस जोहान्सेनचे आव्हान 21-13, 17-21, 21-19 असे संपुष्टात आणत दुसरी फेरी गाठली. 66 मिनिटे ही झुंज रंगली होती. तरुणने 2023 मध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनचे सुवर्णपदक जिंकले होते. त्याचा पुढील सामना चिनी तैपेईच्या पाचव्या मानांकित लिन चुन-यी याच्याविरुद्ध होईल. मात्र भारताच्या किरण जॉर्जला कडवा प्रतिकार करूनही पराभवाला सामोरे जावे लागले. सहाव्या मानांकित केंटा निशिमोटोने त्याला 11-21, 24-22, 21-17 असे हरवित आगेकूच केली. निशिमोटोने गेल्याच आठवड्यात झालेल्या जपान मास्टर्स स्पर्धेत लक्ष्य सेनला पराभूत करून अंतिम फेरी गाठली होती.