प्रांजली धुमाळला नेमबाजीत सुवर्ण
वृत्तसंस्था / टोकियो
येथे सुरू असलेल्या 2025 च्या डेफ ऑलिम्पिक्स स्पर्धेत भारताची महिला नेमबाज प्रांजली धुमाळने महिलांच्या 25 मी. पिस्तुल नेमबाजीत सुवर्णपदक पटकाविले. या स्पर्धेतील प्रांजलीचे हे तिसरे पदक आहे.
प्रांजलीने या स्पर्धेत यापूर्वी अभिनव देसवालसमवेत मिश्र सांघिक पिस्तुल नेमबाजी प्रकारात सुवर्णपदक तर महिलांच्या एकरपिस्तुल नेमबाजीत रौप्य पदक मिळविले होते. महिलांच्या 25 मी. पिस्तुल नेमबाजी प्रकारात प्रांजली धुमाळने 600 पैकी 573 शॉट्स नोंदवित या स्पर्धेतील नवा विश्वविक्रम करताना सुवर्णपदकाला गवसणी घातली. युक्रेनच्या मोसीना हॅलेनाने या क्रीडा प्रकारात रौप्य पदक तर कोरियाच्या जिऑन जिओनने कांस्यपदक मिळविले. महिलांच्या एअरपिस्तुल नेमबाजीत सुवर्णपदक मिळविणारी भारताची महिला नेमबाज अनुया प्रसाद हिला मात्र महिलांच्या 25 मी. पिस्तुल नेमबाजीत चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत रविवारी भारताच्या अभिनव देसवालने मिश्र सांघिक पिस्तुल नेमबाजीत सुवर्णपदक मिळविले होते. भारताचे हे 15 वे पदक आहे.