यूएईमधील बुद्धिबळ स्पर्धेत प्रणव वेंकटेश अजिंक्य
वृत्तसंस्था/ फुजैराह, यूएई
भारताचा वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियन बुद्धिबळपटू प्रणव वेंकटेशने स्पेनचा ग्रँडमास्टर अॅलन पिचॉटवर चमकदार विजय मिळवित फुजैराह ग्लोबल सुपरस्टार्स बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद पटकावताना अपराजित राहण्याचा विक्रम केला.
प्रणवने 9 पैकी 7 गुण मिळवित जवळचा प्रतिस्पर्धी अमेरिकेचा ब्रँडन जेकब्सन, मेक्सिकोचा जोस एदुआर्दो मार्टिनेझ अलकांतारा आणि इराणचा अमिन तबातबाइपेक्षा पूर्ण एका गुणाची आघाडी घेतली. या तिघांनी प्रत्येकी 6 गुणांसह संयुक्त दुसरे स्थान मिळविले. भारताचे जीएम आदित्य मित्तल व अग्रमानांकिन निहाल सरी यांनी 5.5 गुणांसह संयुक्त पाचवे स्थान घेतले. आदित्यला एकूण सहावे स्थान मिळाले तर निहालला 12 व्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्याला या स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात प्रणवकडून हार पत्करावी लागली होती.
नऊ फेऱ्यांच्या या स्पर्धेत प्रणव अपराजित राहिला. त्याने पाच डाव जिंकले तर चार अनिर्णीत ठेवले. त्याला जेतेपदाचे 23000 अमेरिकन डॉलर्स आणि 28 एलो रेटिंग गुण मिळाले. 18 वर्षीय प्रणवने आपल्या खेळात 2843 रेटिंग असणाऱ्या ग्रँडमास्टरसारखी प्रगल्भता दाखवली. आता उझ्बेकिस्तानमधील समरकंद येथे होणाऱ्या ग्रँड स्विस स्पर्धेत तो सहभागी होणार आहे. ही एक प्रतिष्ठित व बलाढ्या खेळाडूंचा सहभाग असणारी स्पर्धा असून सर्वोत्तम बुद्धिबळपटूंच्या लढती पहावयास मिळणार आहेत. सहभागी होणाऱ्या खेळाडूंत वर्ल्ड चॅम्पियन डी गुकेश, आर. प्रज्ञानंद, अर्जुन एरिगेसी, विदित गुजराती, पी. हरिकृष्ण यांच्यासह भारताचे अनेक प्रतिभावान खेळाडू तसेच उझ्बेकचा नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्ह, हॉलंडचा अनीश गिरी, रशियाचा इयान नेपोमनियाची यांच्यासारख्या नामवंत बुद्धिबळपटूंचा समावेश आहे.