प्राणप्रतिष्ठा अयोध्येत, अद्भूत तरंग कारवारात
सदाशिवगड, सुकेरी, गोकर्ण येथील राम मंदिरांना अक्षरश: प्रति अयोध्येचे स्वरूप
कारवार : जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरील तालुक्यातील रामनगरपासून (ता. जोयडा) सिद्धापूरपर्यंत आणि किनारपट्टीवरील तालुक्यातील माजाळीपासून (ता. कारवार) भटकळपर्यंतच्या जनतेने अतिशय भारावलेल्या वातावरणात अयोध्यानगरीतील श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा अनुभवला. सोहळा अयोध्येत झाला असला असला तरी सोहळ्याचे अद्भूत तरंग संपूर्ण जिल्ह्यात उमटल्याचे दिसून आले. आपण एका ऐतिहासिक अलौकिक आणि पवित्रक्षणांचे साक्षीदार ठरल्याचे समाधान लाखो जिल्हावासियांच्या चेहऱ्यावर दिसून आले. जिल्ह्यातील अनेकांनी प्राणप्रतिष्ठा सोहळा म्हणजे अस्मितेचा स्वाभिमानाचा आणि आत्मविश्वासाचे प्रतिक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. ढोलताशांचा गजर आणि ‘रघुपती राघव राजाराम पतीत पावन सीताराम’ आदींच्या जयघोषाने जिल्ह्यातील वातावरण राममय बनले होते.
आनंद, उल्हास, जल्लोष व सोबतीला फटाक्यांची आतषबाजीसह अनेकांच्या चेहऱ्यावर स्वप्न साकार झाल्याची भावना स्पष्ट जाणवत होती. जिल्ह्यातील आघाडीच्या महाबळेश्वर (गोकर्ण) मारीकांबा (शिरसी), मुर्डेश्वरसह जिल्ह्यातील शेकडो मंदिरातर्फे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा गोडवा लुटला. कारवार तालुक्यातील कणसगिरी (सदाशिवगड), सुकेरी व गोकर्ण येथील राम मंदिराना तर अक्षरश: प्रति अयोध्येचे स्वरूप प्राप्त झाले होते. कारवार तालुक्यातील शिवाजी चौकात (सदाशिवगड), माजाळी येथील रामनाथ मंदिरात कणसगिरी येथील राममंदिरात, बैतखोल येथील मारुती मंदिरासह अनेक संघटनांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. जिल्ह्यात ठिकठिकाणी शोभायात्रेचे आयोजन केले होते. कोडीबाग, कारवार येथे काढण्यात आलेली शोभायात्रा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. या शोभायात्रेत शेकडो वाहनधारक सहभागी झाले होते. दुचाकी रॅलीमध्ये महिलांचा सहभाग मोठा होता. जिल्ह्यात बहुतेक सर्व ठिकाणी श्रीरामाचे बॅनर्स, कटआऊटस, भगवेध्वज, पताका लावल्या होत्या. त्यामुळे सर्वत्र भगव्या वातावरणाची निर्मिती झाली होती.
संध्याकाळी गंगाआरती, दीपोत्सव उत्साहात
गोकर्ण येथे गंगा आरतीचे आयोजन करण्यात आले हेते. कारवार तालुक्यातील सदाशिवगड येथील मारुती देवस्थानासह (बंगलेवाडा) अन्य काही ठिकाणी दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. भजन कीर्तन, आरती, प्रसाद आदी कार्यक्रमाने सोहळ्यांची सांगता झाली.