प्राणप्रतिष्ठा झाली, आता लक्ष्य लोकसभा
भाजपने प्रभू श्रीरामाच्या नावाने लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडलेलाच आहे. अर्थात तो त्यांचा अधिकारच आहे. गोव्यातील राजकारणही रामभक्तीत मागे राहिलेले नाही. भाजपच्या रामनामाच्या उद्घोषामुळे विरोधी पक्षांची मात्र गोची झालेली आहे. राष्ट्रीय पातळीवरही तेच आणि गोव्यातही तेच. लोकसभा निवडणुकांना अवघ्या तीन महिन्यांचा कालावधी आहे. विकास आणि हिंदुत्वासमोर जनता झुकेल, अशी अपेक्षा भाजपला आहे.
हिंदुत्व आणि श्रीराम मंदिर हा या पक्षाच्या तत्त्वांचाच भाग. गोव्यात काँग्रेसयुक्त भाजप आहे एवढाच फरक. त्यांनीसुध्दा रामभक्तीत उणीव ठेवलेली नाही. श्रीरामाच्या नावाने गोव्यातही निवडणुकीची जय्यत तयारी सुरू आहे. प्राणप्रतिष्ठेनंतरचे लक्ष्य लोकसभाच आहे. आपला गोवा श्रीरामाच्या मार्गानेच जातो की, वेगळ्या मार्गाचा अवलंब करतो, हे येणारा काळच सांगेल मात्र हिंदुत्वाची जादू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिश्माच गोव्यातील भाजपचा मुख्य आधार आहे.
भाजपने श्रीराम मंदिराचा संकल्प अखेर पूर्ण केला. अयोध्येत उभे राहिलेले प्रभू श्रीराम मंदिर आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याने देशाला ढवळून काढले. भाजपने यात झोकून दिले.
अर्थात या पक्षाचा तो अधिकारच आहे. गोव्यातील भाजपनेही वातावरण निर्मितीत उणीव ठेवलेली नाही. या सर्वांमागे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी आहे, हे कुणी सांगण्याची गरज नाही. श्रीराम जन्मभूमी मुक्तीची यशस्वी झालेली चळवळ आणि उभे राहिलेले भव्य श्रीराम मंदिर विरोधी पक्षांना अडचणीचे ठरलेले आहे, हे नक्की. श्रीराम जन्मभूमीच्या मुक्तीसाठी पाचशे वर्षे चाललेला संघर्ष जगातील एकमेव असेल. गेल्या काही दशकांत रामजन्मभूमी हा राजकीय विषय ठरला. याच प्रश्नाच्या जोरावर भारतीय जनता पार्टी घराघरात पोहोचली अन् सत्तेचे सोपान चढली. रामजन्मभूमी चळवळीला राजकीय पाठबळ मिळाले. पाचशे वर्षांचा हा संघर्ष अखेर दीर्घ कायदेशीर लढाईनंतरच संपुष्टात आला. तब्बल पाच शतकांचा इतिहास असलेला रामजन्मभूमीचा विजय देशातला हिंदू समाज जर भव्य-दिव्य प्रमाणात साजरा करीत असेल तर त्यात आश्चर्य नाही. अयोध्येतील श्रीरामाचे भव्य-दिव्य मंदिर हे हिंदुंचे स्वप्न होते व स्वाभिमानाचे प्रतिक आहे, यात वाद नाही. या उद्दिष्ट पूर्ततेसाठी विश्व हिंदू परिषद, भाजप आणि संपूर्ण संघ परिवाराने गेली अनेक दशके कंबर कसली, यातही वाद नाही. आज तेच सत्तेवर आहेत. या विजयाचे श्रेय तेच घेतील, यातही वाद असूच शकत नाही. आपल्या दीर्घकालीन लढ्याचे यश तेही साजरे करीत आहेत. भारतात सत्तेवर असलेला एक राजकीय पक्ष आणि त्यांची राज्या-राज्यातील सरकारे धार्मिक कार्यात पूर्णपणे झोकून देताना जगाला प्रथमच पाहायला मिळाले आहे. काहींसाठी हा अपूर्व आनंदाचा क्षण आहे, काहींसाठी सत्त्व आणि स्वाभिमानाचा विषय आहे. काहींचे हिंदुत्व आताच जागृत झालेले आहे तर काहींसाठी न्याय-राजकारणाचा विषय आहे तर काहींसाठी राजकीय द्वेष व मत्सराचा विषय आहे.
श्रीरामोत्सवाच्या राष्ट्रीय प्रवाहात गोवाही सामील झाला. गोव्यातही उत्स्फूर्त आनंद दिसून आला. पंतप्रधानांच्या आदेशावरून गोव्यातही भाजपच्या मंत्री, आमदार, नेत्यांनी मंदिरांची सफाई केली. राणे दाम्पत्याप्रमाणेच मोन्सेरात व लोबो दाम्पत्यही सफाईत आघाडीवर होते. नेत्यांनी गावागावात फिरून अक्षता वाटपही केले. ठिकठिकाणी सोहळ्यांच्या आयोजनासाठी पुढाकारही घेतला. तन-मन-धन ओतून रामभक्तीत जवळपास महिना खर्ची घातला. एरवी राजकारण आणि धर्म या दूरच्या गोष्टी असतात मात्र ज्या राजकीय पक्षाने श्रीराम जन्मभूमीच्या मुक्ती आणि मंदिर उभारणीसाठी चळवळ उभी केली, तो राजकीय पक्ष अशा देशव्यापी सोहळ्यापासून स्वत:ला अलग ठेवणेच शक्य नाही. आज गोव्यातही भाजपवर धर्माच्या आणि श्रीरामाच्या नावाने राजकारण करीत असल्याचे आरोप विरोधी पक्षाकडून होत आहेत. श्रीराम मंदिराच्या प्रश्नावरून भाजपाने विरोधी पक्षांची गोची केलेली आहे. ‘धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय’, अशी स्थिती काही पक्षांची झालेली आहे. आम्हीसुद्धा हिंदू आहोत, आम्हालासुद्धा हिंदुत्वाचा गर्व आहे. प्रभू श्रीराम भाजपचेच नव्हे आम्हा सर्वांचे आहेत, अशा वल्गना भाजपविरोधी नेत्यांकडून केल्या जात असल्या तरी अयोध्येत श्रीराम मंदिर व्हायलाच हवे, अशी इच्छा कधी इतर राजकीय पक्षांकडून गोव्यातसुद्धा कधी व्यक्त झाली नाही.
रामजन्मभूमीच्या प्रश्नाशी इतर राजकीय पक्षांना कधीच देणे-घेणे नव्हते. उलट रामजन्मभूमी आणि श्रीरामाच्या मंदिरासाठी लढणाऱ्या भाजपला सतत टीकेचे धनी बनविले. भाजपच्या यादीमध्ये हा प्रश्न आरंभापासूनच होता. त्यामुळे भाजप श्रीरामाच्या नावाने राजकारण करतो, असे म्हणण्यात आता काही अर्थ नाही. भाजपला दोष देण्यातही अर्थ नाही. श्रीराम आमचाही आहे, हे कितीही ओरडून सांगितले तरी रामजन्मभूमी मुक्तीच्या चळवळीत विरोधी पक्षांचे योगदान शून्य आणि या चळवळीला सहानुभूतीही शून्यच होती, हे सत्य नाकारता येत नाही. भाजपने जे कष्ट उपसले आणि जे यश कमावले, त्यातून जर त्यांना उन्माद आलेला असेल तर ते निमूटपणे पाहण्यावाचून आता गत्यंतर नाही.
मार्च उजाडताच लोकसभा निवडणुकांची घोषणा होईल. भाजपाने प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने प्रचाराचा नारळ आधीच फोडलेला आहे. प्रमुख राजकीय पक्ष असलेला काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांची रणनीतीच अद्याप दिसून येत नाही. गोव्यात इंडिया आघाडीमध्ये कुणाच्या वाटेला काय येईल, याचाही काही पत्ता नाही. भाजपकडे यंदा आमदारांची मोठी फौज आहे. यंदा मगो पक्षाचीही साथ मिळणार आहे. दक्षिणेची जागा काँग्रेस व्यतिरिक्त इतरांना सहज मिळत नाही. त्यासाठी सगळे योग जुळून यावे लागतात. भाजप योग जुळविण्याच्या प्रयत्नात आहे. यंदा दक्षिणेसाठी अडचणी नसल्या तरी उमेदवार कोण, या गोष्टीवरही बरेच काही अवलंबून आहे. उत्तरेत काँग्रेससाठी माजी केंद्रीयमंत्री रमाकांत खलप तगडे उमेदवार ठरू शकतात. भाजपातील काहींना, केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांनी विश्रांती घ्यावी, असे वाटत असले तरी भाजपकडे श्रीपाद नाईकांच्या तोडीचा उमेदवार नाही, हे सत्य नजरेआड करता येणार नाही. भाजपचे काँग्रेसीकरण ही गोवा भाजपची खरी अडचण आहे.
अनिलकुमार शिंदे