Kolhapur Breaking : 'हातकणंगलेत' प्रकाश आवाडे यांची तलवार म्यान! मुख्यमंत्र्यांच्या मनधरणीनंतर लोकसभेच्या रिंगणातून माघार
हातकणंगले मतदारसंघामध्ये मुख्यमंत्र्यांनी दोन दिवस ठिय्या माडून बसलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमदार प्रकाश आवाडे यांचे बंड मोडून काढण्यास यश मिळाले. हातकणंगले तालुक्यामध्ये ताराराणी पक्षाकडून आपण लोकसभेच्या मैदानात उतरल्याचं जाहीर करताच मुख्यमंत्र्यांनी स्वत: कोल्हापूरात येऊन आपले उमेदवार धैर्यशील माने यांच्यासाठी राजकिय़ जोडणा लावल्या.
संपुर्ण राज्याचे लक्ष लागून राहीलेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक दिवसाला नवनविन घडामोडी पहायला मिळत आहे, विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्यावर पहिल्यापासून नाराज असलेल्या आमदार प्रकाश आवाडे यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलूनही दाखवली. त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील यांच्या भेटीनंतर त्यांनी हातकणंगले मतदारसंघासाठी शड्डू ठोकला.
दरम्यान, त्यांच्या या निर्णयानंतर मुख्यमंत्री तातडीने कोल्हापूर दौऱ्यावर आले. त्यांनी हातकणंगले मधील अनेक राजकिय नेत्यांची भेट घेत धैर्यशील माने यांच्यासाठी राजकिय जोडण्या लावल्या. मुख्यता आमदार प्रकाश आवाडे यांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांचा पाठींबा मिळवण्याचा प्रयत्न केला. प्रकाश आवाडे यांच्या बंडामुळे महायुतीच्या मतांमध्ये मोठी फुट पडण्याची शक्यता असल्याने त्यांनी मंत्री शंभुराजे देसाई यांच्यासमवेत प्रकाश आवाडे यांची मनधरणी केली.
त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाले असून प्रकाश आवाडे यांनी आता हातकणंगलेच्या लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली आहे. खासदार धैर्यशील माने यांचा अर्ज आज दाखल केला जाणार असून मुख्यमंत्र्यांच्या आग्रहा खातर आमदार प्रकाश आवाडे स्वता माने यांच्या अर्ज दाखल करण्यासाठी जाणार आहेत.