प्रज्ज्वलचा पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू
मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्यांदा पत्र पाठविल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाकडून हालचाली
बेंगळूर : अश्लील चित्रफीत आणि लैंगिक शोषण प्रकरणी आरोप असणारे प्रज्ज्वल रेवण्णा यांनी विदेशात पळ काढून 27 दिवस उलटले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पंतप्रधानांना दुसऱ्यांदा पत्र पाठविल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाकडून प्रज्ज्वल रेवण्णा यांचा पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रज्ज्वल यांच्याविरोधात लुकआऊट, ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी झाली आहे. अटक वॉरंटही जारी करण्यात आले आहे. दरम्यान, त्यांना भारतात आणण्यासाठी अनुकूल व्हावे, या उद्देशाने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणखी एक पत्र पाठविले आहे. लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी खासदार प्रज्ज्वल रेवण्णा विदेशात असून पासपोर्ट अॅक्ट 1967 च्या सेक्शन 10(3)(एच) अंतर्गत प्रज्ज्वल यांचा राजतांत्रिक पासपोर्ट रद्द करून त्यांना भारतात आणण्याची कार्यवाही करावी, अशी विनंती सिद्धरामय्या यांनी केली आहे. त्यापाठोपाठ प्रज्ज्वल यांना देण्यात आलेला राजतांत्रिक पासपोर्ट रद्द करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.
लैंगिक शोषण प्रकरणात आरोपी असणारे प्रज्ज्वल रेवण्णा हे खासदार आणि माजी पंतप्रधानांच्या कुटुंबातील सदस्य आहेत. त्यांनी राजतांत्रिक पासपोर्ट वापरून विदेश प्रयाण केले आहे. एफआयआर दाखल होण्याआधी काही तास अगोदर त्यांनी देश सोडला. त्यांच्यावर अत्याचार, लैंगिक शोषण, धमकी व दबाव आणून चित्रिकरण करणे, असे आरोप आहेत. अशा आरोपीने राजतांत्रिक पासपोर्ट वापरून कायद्याच्या कचाट्यातून बचाव करून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे प्रज्ज्वलचा पासपोर्ट रद्द करून त्यांना भारतात आणण्यासाठी सहकार्य करा, अशी विनंती सिद्धरामय्यांनी पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रामध्ये केली आहे. प्रज्ज्वल यांच्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी राज्य गृहखात्यामार्फत परराष्ट्र मंत्रालयाला पत्र पाठविले आहे. मागील वेळी मुख्यमंत्र्यांनी पत्र पाठविल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने न्यायालयाचा आदेश आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर एसआयटीने प्रज्ज्वलविरोधात न्यायालयाकडून अटक वॉरंट मिळवून पुन्हा पत्र पाठविले आहे. त्यामुळे परराष्ट्र मंत्रालयाने प्रज्ज्वल यांचा राजतांत्रिक पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे. पासपोर्ट भारतीय प्राधिकरण विभाग परराष्ट्र खात्याच्या अखत्यारित येतो. एसआयटीकडून आलेले पत्र खातरजमा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठविण्यात आले आहे. गृहमंत्रालयाने पडताळणी करून संमती दिल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाकडून पासपोर्ट रद्द करण्यात येईल.
...तर पुढे काय?
एकदा पासपोर्ट रद्द झाला तर याविषयी सर्व देशांना माहिती दिली जाते. त्यामुळे प्रज्ज्वल रेवण्णा यांना भारतात परतण्याची अनिवार्य स्थिती येईल. पासपोर्ट रद्द झाल्यानंतर त्यांना दोन पद्धतीने भारतात आणले जाऊ शकते. ज्या देशात प्रज्ज्वल आहे, त्या देशाकडून त्यांचे हस्तांतर प्रकियेअंतर्गत भारतात आणले जाऊ शकते. मात्र, त्या देशाशी आधी करार केलेला असला पाहिजे. अन्यथा हद्दपार प्रक्रियेनेही प्रज्ज्वलना देशात आणता येईल.