प्रज्ज्वलची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली
प्रतिनिधी/ बेंगळूर
हासन जिल्हा पंचायतीच्या माजी सदस्यावर अत्याचार केल्याच्या आरोपप्रकरणी माजी खासदार प्रज्ज्वल रेवण्णा याने दाखल केलेली अटकपूर्व जामीन याचिका शुक्रवारी उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे प्रज्ज्वलची निराशा झाली आहे.
यापूर्वी तीन प्रकरणांमध्ये प्रज्ज्वलची जामीन याचिका फेटाळण्यात आल्या होता. चौथ्या प्रकरणात त्याने अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण करून उच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. शुक्रवारी त्याला जामीन मंजूर करण्यास न्यायमूर्ती एम. नागप्रसन्न यांच्या एकसदस्यीय पीठाने नकार दिला.
याचिकाकर्त्यांच्या वतीने वकील जी. अरुणकुमार यांनी अर्ज मागे घेण्यात येईल. या प्रकरणात आरोपपत्र दाखल झालेले नाही. पीठाने सध्याच्या आरोपपत्राचा विचारच केलेला नाही. केवळ तक्रारीच्या आधारावर याचिका फेटाळाली आहे, अशी प्रतिक्रिया दिली.
प्रकरणाची पार्श्वभूमी...
2021 मध्ये बीसीएम हॉस्टेलमधील मुलींच्या सुविधांसबंधी चर्चा करण्यासाठी तक्रारदार महिला प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या कार्यालयात गेल्या होत्या. कामाचा ताण अधिक असल्याने दुसऱ्या दिवशी येण्यास प्रज्ज्वल यांनी सांगितले. त्यानुसार दुसऱ्या दिवशी पुन्हा कार्यालयात गेल्यानंतर पिस्तूलचा धाक दाखवून अत्याचार केला. मोबाईलमध्ये याचे चित्रिकरणही केले होते. त्यानंतर अनेक वेळा व्हिडिओ कॉल करून त्रास दिला. याविषयी वाच्यता केल्यास गंभीर परिणामाला सामोरे जावे लागेल, असा आरोप पीडित महिलेने तक्रारीत केला होता. यासंबंधी 1 मे 2024 रोजी एसआयटीच्या प्रमुखांकडे तक्रार दाखल झाली होती. याच्या आधारावर बेंगळूरच्या सीआयडीच्या सायबर गुन्हे विभागात विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणात प्रज्ज्वलने अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली होती.