कोणत्याही क्षणी प्रज्ज्वल भारतात परतण्याची शक्यता
तात्काळ ताब्यात घेण्यासाठी एसआयटीची तयारी : विविध विमानतळांवर पाळत
प्रतिनिधी/ बेंगळूर
पीडितेचे अपहरण केल्याप्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) शनिवारी होळेनरसीपूरचे आमदार एच. डी. रेवण्णा यांना अटक केली आहे. दरम्यान, त्यांचा मुलगा खासदार प्रज्ज्वल रेवण्णा आज किंवा उद्या भारतात परतण्याची शक्मयता आहे. या पार्श्वभूमीवर बेंगळूर, मंगळूर, गोव्यासह विविध विमानतळांवर विशेष पाळत ठेवण्यात आली आहे. प्रज्ज्वलचा शोध घेण्यासाठी यापूर्वीच लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यामुळे प्रज्ज्वल भारतात उतरताच त्यांना ताब्यात घेण्याची तयारी एसआयटी अधिकाऱ्यांनी केली आहे.
या प्रकरणी आणखी तीन पीडित एसआयटी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आल्या असून या संदर्भात चौकशी सुरू झाली आहे. चौकशीनंतर स्वतंत्र गुन्हे दाखल होण्याची शक्मयता आहे. हासन व्हिडिओ प्रकरणाबाबत अनेक आरोप झाल्यानंतर एसआयटीने प्रज्ज्वल रेवण्णा यांना चौकशीला उपस्थित राहण्यासाठी नोटीस बजावली होती. परदेशात असल्याने त्यांनी सुनावणीला उपस्थित राहण्यासाठी 7 दिवसांची मुदत मागितली होती. मात्र, एसआयटीने ही मागणी फेटाळून लावली होती. तसेच लुकआउट नोटीसही जारी करण्यात आली होती.
आणखी तीन पीडितांची एसआयटीकडे धाव
लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या हासनचे खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांचा एसआयटीने परदेशात शोध सुरू केला असून या प्रकरणातील आणखी तीन पीडित महिलांनी एसआयटीकडे धाव घेतली असल्याचे सूत्रांनी रविवारी सांगितले. आमदार एच. डी. रेवण्णा यांना शनिवारी अटक केल्यानंतर पीडितांनी एसआयटीशी संपर्क साधला असून ते लवकरच त्यांचे म्हणणे नोंदवण्याची शक्मयता आहे. या संदर्भात अधिक तपशील अद्याप समोर आलेला नाही. वडील, निजद आमदार एच. डी. रेवण्णा यांच्या अटकेनंतर अश्लील व्हिडिओ घोटाळ्यातील प्रमुख आरोपी प्रज्ज्वल रेवण्णा लवकरच अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण करण्याची शक्मयता आहे.