श्रमप्रतिष्ठेऐवजी बौद्धिक कामाचे स्तोम
हेरंब कुलकर्णी यांचे भाऊराव काकतकर कॉलेजमध्ये व्याख्यान
बेळगाव : दिवसेंदिवस महाग होत जाणाऱ्या शिक्षणाचा खर्च समाजातील गरीब, वंचित आणि तळागाळातील लोकांना पेलवणारा नाही. त्यामुळे त्यांची शिक्षणामधील आसक्तीच संपली आहे. श्रमप्रतिष्ठेला महत्त्व मिळण्याऐवजी बौद्धिक कामाचे स्तोम माजवले जात आहे. त्यामुळे भारत विरुद्ध इंडिया यांच्यामध्ये विषमतेची दरी निर्माण झाली असून त्यातून बाहेर येण्यासाठी तरुणाईने वास्तव समजून घेऊन आपली वाटचाल केली पाहिजे, असे मत शिक्षणतज्ञ, विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
येथील भाऊराव काकतकर कॉलेज मराठी विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर संस्थेचे सचिव प्रा. विक्रम पाटील, प्राचार्य एम. व्ही. शिंदे व सुरेश पाटील उपस्थित होते. हेरंब कुलकर्णी म्हणाले, आज आपल्याकडे प्रचंड प्रमाणात संपत्ती निर्माण होत आहे. परंतु, ती तळापर्यंत झिरपत नाही. शेती परवडत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करत आहेत. कंत्राटी कामांमध्ये शोषणच जास्त आहे. परिणामी शिकून काहीच उपयोग नाही, अशी मानसिकता गरीब घटकांची झाली आहे.
दुसरीकडे तरुणाईला शेती करणे मान्य नाही आणि ज्यांना शेण उचलावे लागते, त्यांना शिक्षण नको आहे. या विषमतेमुळे कष्टकरी वर्गातील मुलांचे आज विवाहसुद्धा होत नाहीत. मुलींची संख्या कमी असल्याने मुलींना निर्णय स्वातंत्र्य मिळाले आहे. ज्या शेतीतून वडिलांनी काहीच कमावले नाही ती शेती करणारा नवरा नको, असे मुली म्हणत आहेत. याचा परिणाम अनेक अविवाहित तरुणांची संख्या वाढण्यामध्ये होत आहे. ही संख्या वाढत गेली तर मुलींची सुरक्षितता पुन्हा ऐरणीवर येण्याचा धोका हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केला.
हे सर्व वास्तव तरुणाईनेच समजून घेतले पाहिजे. समाजाचे प्रश्न आपले मानले पाहिजेत. प्रचंड वाचन केले पाहिजे. मोबाईलचा सदुपयोग समाजाचे प्रश्न जाणून घेण्यासाठी करायला हवा. इंग्रजीवर प्रभुत्व हवे. स्वत:ला विकसित करण्यासाठी कौशल्ये आत्मसात करून घ्यायला हवीत. हे वय प्रेमात पडण्याचे नाही तर आपले आयुष्य मार्गी लावण्याचे आहे. त्यामुळे प्रथम शिक्षण, अर्थार्जन आणि विवाह हा क्रम तुम्ही ठेवा, असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले.