प्रज्ञानंद कार्लसनविरुद्ध पराभूत
स्टॅव्हेंगर (नॉर्वे)
नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या आठव्या फेरीत भारताचा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदला नॉर्वेचा अव्वल मानांकित बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनविऊद्ध पराभव पत्करावा लागलेला असला, तरी त्यापूर्वी त्याने जोरदार लढत दिली. दुसरीकडे, त्याची थोरली बहीण आर. वैशालीने युक्रेनच्या अॅना मुझिचूकचा पराभव केला.
या विजयासह कार्लसनने फ्रान्सच्या फिरोजा अलिरेझाकडून पराभूत झालेल्या अमेरिकेच्या हिकारू नाकामुरावरील आपली आघाडी पूर्ण गुणाने वाढवली आहे. दरम्यान, विश्वविजेत्या डिंग लिरेनची निराशाजनक कामगिरी कायम राहिलेली असून त्याला अमेरिकेच्या फॅबियानो काऊआनाकडून पराभव पत्करावा लागला. सहा खेळाडूंच्या दुहेरी राऊंड-रॉबिन स्पर्धेत फक्त दोन फेऱ्या बाकी असताना, कार्लसन 14.5 गुणांनिशी नाकामुरापेक्षा (13.5 गुण) पुढे आहे. 12 गुण झालेला प्रज्ञानंद तिसऱ्या क्रमांकावर असून तो अलिरेझापेक्षा पूर्ण गुणाने आघाडीवर आहे. काऊआना नऊ गुणांनिशी पाचव्या स्थानावर आहे, तर लिरेन 4.5 गुणांनिशी शेवटच्या स्थानावर आहे.
महिला विभागात चीनच्या विश्वविजेत्या वेनजून जूने स्वीडनच्या पिया क्रॅमलिंगवर मात करत 14.5 गुणांनिशी आघाडीवर जाण्यात यश मिळविले आहे. वैशालीविऊद्ध मुझिचूकच्या पराभवाचा तिला याकामी फायदा झाला. मुझिचूक 13 गुणांसह दुसऱ्या स्थानावर असून वैशाली आणि चीनच्या टिंगजी लेई यांच्यापेक्षा 1.5 गुणांनी पुढे आहे. लेईने कोनेरू हम्पीला पराभूत केले. आठ गुणांसह हम्पी क्रमवारीत पाचव्या स्थानावर असून क्रॅमलिंगपेक्षा 3.5 गुणांनी ती पुढे आहे.