प्राग मास्टर्स : अरविंद विजेता, प्रज्ञानंद दुसऱ्या स्थानावर
वृत्तसंस्था/ प्राग
ग्रँडमास्टर अरविंद चिदंबरमने येथील प्राग मास्टर्स स्पर्धेत सहकारी आर. प्रज्ञानंदसह प्रस्थापित नावांना मागे टाकत आपल्या कारकिर्दीतील पहिले मोठे जेतेपद पटकावल्याने बुद्धिबळातील भारताचे वर्चस्व अबाधित राहण्यास मदत झाली आहे. 25 वर्षीय अरविंदने नवव्या आणि शेवटच्या फेरीत तुर्कीच्या गुरेल एडिजसोबतचा सामना बरोबरीत सोडवून सहा गुणांसह स्पर्धेचा शेवट केला.
जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावर असलेल्या प्रज्ञानंदला डच खेळाडू अनीश गिरीकडून पराभूत व्हावे लागून त्याने दुसरे स्थान पटकावले. तामिळनाडूच्या अरविंदने स्पर्धेत तीन विजय नोंदवले आणि सहा सामने अनिर्णित ठेवले. प्रज्ञानंदने गिरी आणि अव्वल मानांकित चीनच्या वेई यी यांच्यासह पाच गुणांवर आपल्या मोहिमेची सांगता केली.
अरविंदने एडिझच्या किंग पॉन पद्धतीचा मुकाबला करण्यासाठी कॅरो कान पद्धतीची निवड केली आणि गुंतागुंत कायम राहून शेवटी लढत बरोबरीत सुटली. ‘गेल्या दोन दिवसांत मी नीट झोपलो नाही. सातव्या फेरीपर्यंत मी पूर्णपणे ठीक होतो. त्यानंतर मला ही आघाडी मिळाली आणि दबाव राहिला’, असे अरविंद नंतर म्हणाला. त्याने आपले मार्गदर्शक आणि प्रशिक्षक ग्रँडमास्टर आर. बी. रमेश यांचेही कौतुक केले आणि अनीश गिरीविऊद्धचा सामना हा स्पर्धेतील आपला सर्वोत्तम प्रयत्न होता असे सांगितले. दिव्या देशमुखने चॅलेंजर्स विभागात ग्रीसच्या स्टामाटिस कौरकौलस-आर्डिटिसविऊद्धचा शेवटच्या फेरीतील सामना जिंकण्यात यश मिळविले.