प्रज्ञानंदला उझचेस कपचे जेतेपद
बनला भारताचा अव्वल खेळाडू
वृत्तसंस्था/ ताश्कंद
जगात आता चौथ्या क्रमांकावर असलेल्या प्रज्ञानंदने जागतिक विजेता डी. गुकेश आणि अर्जुन एरिगेईसी यांना मागे टाकत लाईव्ह रेटिंगमध्ये अव्वल क्रमांकाचा भारतीय खेळाडू बनण्यात यश मिळविले आहे. शुक्रवारी ताश्कंद येथे झालेल्या उझचेस कप मास्टर्स 2025 जिंकल्यानंतर ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद लाईव्ह रेटिंगमध्ये भारताचा अव्वल क्रमांकाचा बुद्धिबळपटू बनला आहे.
या विजयामुळे प्रज्ञानंदचे लाईव्ह रेटिंग 2778.3 वर पोहोचले आहे. ज्यामुळे तो जागतिक क्रमवारीत तीन स्थानांनी वर म्हणजे चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोच्च रँकिंग आहे. या 19 वर्षीय खेळाडूने जागतिक विजेता डी. गुकेश (2776.6) आणि अर्जुन एरिगेईसी (2775.7) यांना मागे टाकले आहे. एरिगेसी हा गुऊवारपर्यंत भारताचा अव्वल क्रमांकाचा खेळाडू होता, परंतु आता तो जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर घसरला आहे.
मॅग्नस कार्लसन (2839.2) अव्वल स्थानावर आहे, त्यानंतर हिकारू नाकामुरा (2807.0) आणि फॅबियानो काऊआना (2784.2) हे आहेत. प्रज्ञानंदने शेवटच्या दिवसाची सुऊवात स्थानिक नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्हपेक्षा एक गुण मागे आणि जावोखिर सिंदारोव्हपेक्षा अर्धा गुण मागे अशा परिस्थितीत केली. शेवटच्या फेरीत अब्दुसत्तोरोव्हवर मिळविलेल्या महत्त्वपूर्ण विजयामुळे त्याला राउंड-रॉबिन टप्प्याच्या शेवटी 5.5 गुणांनिशी दोन्ही खेळाडूंना येऊन मिळण्यास मदत झाली.
एरिगेसीला अरविंद चिदंबरमशी बरोबरी साधावी लागल्याने त्यांच्यात सामील होण्याची संधी हुकली. टायब्रेकच्या पहिल्या फेरीत तिन्ही खेळाडूंचे दोन गुण झाले. अब्दुसत्तोरोव्ह आणि सिंदारोव्हने त्यांचे दोन्ही सामने बरोबरीत सोडविले, तर प्रज्ञानंदने पांढऱ्या सोंगाट्या घेऊन खेळताना दोघांनाही हरविले, परंतु काळ्या सोंगाट्या घेऊन खेळताना त्याला पराभव पत्करावा लागला.
दुसऱ्या टायब्रेकमध्ये प्रज्ञानंदने पांढऱ्या सोंगाट्यांनिशी खेळताना अब्दुसत्तोरोव्हला बरोबरीत रोखले आणि काळ्या सोंगाट्या घेऊन खेळताना सिंदारोव्हला हरवले. सिंदारोव्हने नंतर अब्दुसत्तोरोव्हवर विजय मिळविल्याने भारतीय खेळाडूचे जेतेपद निश्चित झाले. टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा आणि रोमानियातील ग्रँड बुद्धिबळ टूर सुपरबेट क्लासिकच्या विजेतेपदानंतर प्रज्ञानंदचे हे वर्षातील तिसरे विजेतेपद आहे.