प्रज्ञानंद प्रथमच ‘टाटा स्टील मास्टर्स’ विजेता
विश्वविजेत्या गुकेशसमवेत संयुक्तपणे अव्वल स्थानी राहिल्यानंतर टायब्रेकरमध्ये 2-1 ने सरशी
वृत्तसंस्था/ विज्क अॅन झी (नेदरलँड्स)
आंतरराष्ट्रीय बुद्धिबळात भारतीय ध्वज फडकणे कायम राहिले असून ग्रँडमास्टर आङ प्रज्ञानंदने थकवा आणि तणाव यांच्याशी संघर्ष करत जागतिक विजेता डी. गुकेशला पराभूत करून आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदाच टाटा स्टील मास्टर्सचे विजेतेपद पटकावले.
भारतीय बुद्धिबळाचा गड बनलेल्या चेन्नई येथील या 19 वर्षीय खेळाडूने रविवारी झालेल्या स्पर्धेच्या 87 व्या आवृत्तीच्या टायब्रेकरमध्ये जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या 18 वर्षीय खेळाडूला 2-1 ने मागे टाकले. 13 व्या फेरीतील सामन्यात दोन्ही खेळाडूंनी पराभव पत्करल्यानंतर त्यांचे समान 8.5 गुण झाले. 13 व्या फेरीत गुकेशला भारतीय अर्जुन एरिगेसीने 31 चालींमध्ये नमविले, तर प्रज्ञानंदला जर्मनीच्या विन्सेंट कीमरकडून पराभव पत्करावा लागला.
टायब्रेकरमध्ये या दोन्ही तऊण खेळाडूंना प्रत्येक सामना जिंकण्याचा प्रयत्न केल्याने प्रचंड नाट्यामय लढत पाहायला मिळाली. ‘मी अजूनही कापत आहे, हा खरोखरच भन्नाट दिवस होता. मला कसे व्यक्त करावे हे माहीत नाही. मला खरोखर जिंकण्याची अपेक्षा नव्हती. कशा तरी गोष्टी माझ्या मनाप्रमाणे झाल्या, असे प्रज्ञानंदन त्याच्या विजयानंतर अधिकृत स्पर्धेच्या वेबसाइटवर सांगितले. त्याच्या बुद्धिबळ कारकिर्दीतील हा सर्वांत तणावपूर्ण दिवस होता का असे विचारले असता उत्तर देताना तो म्हणाला, ‘हा दिवस अधिक खास आहे, कारण मी स्पर्धा जिंकली आहे. मात्र निश्चितच सर्वांत तणावपूर्ण दिवस’. टायब्रेकरच्या पहिल्या गेममध्ये प्रज्ञानंदने मधल्या खेळात गुकेशी सहज बरोबरी साधली होती. तथापि, गुकेश प्रयत्न करत राहिला आणि प्रज्ञानंदाच्या एका चुकीचा फायदा घेत त्याने विजय नोंदविला.
टायब्रेकरच्या दुसऱ्या गेममध्ये प्रज्ञानंदने ट्रॉम्पोव्हस्की ओपनिंगचा वापर केला आणि यावेळी गुकेशने काळ्या सोंगाट्यांसह खेळताना थोडीशी अनुकूलता प्राप्त केली होती. तथापि, प्रज्ञानंदने धीराने वाट पाहिली आणि गुकेशच्या एका अनपेक्षित चुकीचा फायदा घेत ब्लिट्झ लढतीत 1-1 अशी बरोबरी साधली. यामुळे सामना ‘सडन डेथ’मध्ये गेला, जिथे प्रज्ञानंदने पांढऱ्या सोंगाट्या घेऊन खेळताना बरोबरी साधली. सडन डेथमध्ये पांढऱ्या सेंगाट्यांनिशी खेळणाऱ्या खेळाडूस दोन मिनिटे आणि तीस सेकंद, तर काळ्या सोंगाट्यांनिशी खेळणाऱ्या खेळाडूस तीन मिनिटे आणि तीस सेकंद अशी वेळ होती. परंतु त्यामुळे प्रज्ञानंद विचलित झाला नाही. हा सामना बरोबरीत सुटून आणखी एक गेम खेळावा लागेल असे वाटत असतानाच गुकेशने लढतीवरील नियंत्रण गमावले. प्रज्ञानंदने मग परिपूर्ण तंत्र दाखवत पूर्ण गुण मिळविला. ‘मी खूप थकलो होतो. मला आता थोडा आराम करायचा आहे’, असे नंतर प्रज्ञानंद म्हणाला.
गुकेशसाठी अव्वल स्थान संयुक्तपणे भूषविण्याचे आणि त्यानंतर टायब्रेकर गमावण्याच हे सलग दुसरे वर्ष आहे. मागील स्पर्धेत गुकेशला चिनी वेई यीकडून पराभव पत्करावा लागला होता.