प्रज्ञानंदची वेस्लीशी बरोबरी, गुकेश शर्यतीतून बाहेर
वृत्तसंस्था/ सेंट लुईस, अमेरिका
ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने येथे झालेल्या सिंकफिल्ड कपच्या आठव्या फेरीत अमेरिकेच्या वेस्ली सोशी बरोबरी साधून ग्रँड चेस टूरमध्ये आघाडीच्या चार खेळाडूंत स्थान मिळवण्याच्या शर्यतीत स्वत:ला कायम ठेवले. विद्यमान विश्वविजेता डी. गुकेशनेही अमेरिकेच्या लेव्हॉन अॅरोनियनशी बरोबरी साधली. परंतु दहा खेळाडूंच्या राउंड रॉबिन स्पर्धेत वरील स्थानांसाठी चालू असलेल्या शर्यतीतून तो बाहेर पडला आहे.
फ्रेंच खेळाडू मॅक्सिम वाचियर-लाग्रेव्हने अमेरिकेच्या फॅबियानो काऊआनाविऊद्ध पांढऱ्या सोंगाट्यांसह खेळताना बरोबरी साधली. कारुआनाने शेवटच्या फेरीतील निकाल काहीही लागो, त्याच्या पहिल्या स्थानासह ग्रँड फिनालेमध्ये स्थान मिळवले आहे. ग्रँड चेस टूर क्रमवारीतील आघाडीचे चार खेळाडू ब्राझीलमधील साओ पाउलो येथे होणाऱ्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील, जी या वर्षापासून सुरू करण्यात आली आहे. वाचियर-लाग्रेव्हच्या व्यतिरिक्त अॅरोनियन, काऊआना आणि प्रज्ञानंद हे अंतिम फेरीसाठीचे प्रबळ दावेदार आहेत.
दरम्यान, प्रज्ञानंद आणि काऊआना हे इतरांपासून अर्ध्या गुणाने पुढे असून आठ सामन्यांतून त्यांचे 5.5 गुण झाले आहे. त्यांच्यापेक्षा अर्ध्या गुणाने मागे वेस्ली आणि अॅरोनियन आहेत, ज्यांनी अमेरिकेचा सॅम्युअल सेव्हियन, पोलंडचा दुडा जान-क्रिजस्टोफ आणि वाचियर-लाग्रेव्ह यांच्यावर तितक्याच गुणाची आघाडी घेतली आहे. 3.5 गुणांसह गुकेश आठव्या स्थानावर आहे आणि फ्रान्सचा अलिरेझा फिरोजा (3 गुण) आणि उझबेकिस्तानचा नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्ह (2.5 गुण) यांच्यापेक्षा तो पुढे आहे.
इटालियन ओपनिंगच्या सामन्यात प्रज्ञानंदला वेस्लीच्या ‘टू नाईट्स डिफेन्स’चा सामना करावा लागला. वेस्लीने योग्य युक्त्या शोधल्या असल्या, तरी दोन्ही खेळाडूंना हे लक्षात आले की, खेळ पुढे जाण्याच्या दृष्टीने फारसे काही शिल्लक नाही. त्यानंतर बरोबरीवर त्यांनी समाधान मानले. दुसरीकडे, ‘क्वीन पॅन ओपनिंग’मधून रंगलेल्या सामन्यात गुकेशने अॅरोनियनशी बरोबरी साधली. मधल्या टप्प्याच्या सुरुवातीला भारतीय खेळाडू थोडा चांगल्या स्थितीत दिसत होता. परंतु त्याचा प्रतिस्पर्धीही फारसा मागे नव्हता. त्यामुळे 77 चालींपर्यंत हा सामना चालला.