For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जमैकाला धडकणार शक्तिशाली चक्रीवादळ

06:13 AM Oct 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
जमैकाला धडकणार शक्तिशाली चक्रीवादळ
Advertisement

मेलिसाच्या पार्श्वभूमीवर लाखो लोकांचे स्थलांतर : वाऱ्याच वेग 282 किमी प्रतितास

Advertisement

वृत्तसंस्था/ जमैका

मेलिसा चक्रीवादळ आता चालू वर्षातील सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ ठरले आहे. कॅरेबियन देश जमैकाच्या दिशेने हे चक्रीवादळ सरकत आहे. यापूर्वी या चक्रीवादळाने हैती आणि डॉमिनिकन रिपब्लिकन या देशांमध्ये मोठा विध्वंस घडवून आणला आहे. मेलिसामुळे आतापर्यंत जमैकामध्ये 3, हैती येथे 3 आणि डॉमिनिकन रिपब्लिकन येथे एका इसमाचा मृत्यू झाला आहे. हे चक्रीवादळ विध्वंसक आणि जीवघेणे ठरू शकते असा इशारा अमेरिकेच्या हवामान शास्त्रज्ञांनी दिला आहे.

Advertisement

मेलिसाचा वेग 175 मैल प्रतितास म्हणजेच जवळपास 282 किलोमीटर प्रतितासापर्यंत पोहोचला आहे. यामुळे श्रेणी-5 मधील चक्रीवादळ ठरले आहे. ही चक्रीवादळांची सर्वात धोकादायक श्रेणी आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर क्यूबामध्ये 6 लाख तर जमैकामध्ये 28 हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

समुद्राचे तापमान वाढल्याने चक्रीवादळ शक्तिशाली

क्लायमेट सेंट्रलच्या वैज्ञानिकांनुसार मेलिसा ज्या समुद्रांवरून गेले, तेथील पाणी हवामान बदलामुळे सुमारे 1.4 अंशाने अधिक तप्त होते. म्हणजेच ही उष्णता मानवी प्रदूषण आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे होती.  समुद्राचे पाणी अधिक उष्ण असल्यास वादळ अधिक आर्द्रता खेचून घेते, यामुळे मेलिसा यासारख्या चक्रीवादळांमध्ये पूर्वीपेक्षा 25-50 टक्के अधिक पाऊस पडू शकतो.

पूर-भूस्खलनाचा धोका वाढला

मेलिसाच्या वेगामुळे सातत्याने अतिवृष्टी होण्याची भीती आहे. यामुळे पूर आणि भूस्खलनाचा धोका वाढला आहे. जमैका सरकारने राजधानी किंग्सटन समवेत अनेक भागांमधून स्थलांतराचे आदेश दिले आहेत. 881 मदतशिबिरे सुरू करण्यात आली असून तेथे लोकांना आश्रय दिला जात आहे. अशाप्रकारचे चक्रीवादळ आम्ही पूर्वी कधीच पाहिले नाही. ऑक्टोबर महिन्याच्या प्रारंभापासून पाऊस पडत आहे, यामुळे मोठा पूर आणि भूस्खलनाची शक्यता अत्यंत अधिक असल्याचे जमैकाच्या शिक्षणमंत्री डाना मॉरिस डिक्सन यांनी सांगितले आहे. 1851 नंतर जमैकाला धडकलेले हे सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ ठरणार आहे.

घरातच थांबण्याचे आवाहन

जमैकाचे पंतप्रधान एंड़्यू होलनेस यांनी नागरिकांना घरातच थांबण्याचे आणि प्रशासनाच्या आदेशांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. आम्ही या संकटातून बाहेर पडू आणि मजबूत होऊ असे त्यांनी म्हटले आहे. तर अमेरिकेच्या एनएचसीचे संचालक मायकल ब्रेनन यांनी तीव्र वारे आणि अतिवृष्टीमुळे जीवघेणा पूर तसेच भूस्खलनाचा धोका असल्याचा इशारा दिला आहे. त्यांनीही लोकांना घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

अन्य देशांमध्येही हानी

चक्रीवादळाच्या प्रभावामुळे हैती आणि डॉमिनिकन रिपब्लिक या देशांमध्ये शेकडो घरांमध्ये पाणी शिरले आहे. डॉमिनिकन रिपब्लिकची राजधानी सँटो डोमिंगोमध्ये एका 79 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला तर एक 13 वर्षीय मुलगा बेपत्ता असल्याचे समजते. तर मंगळवारी रात्री उशिरा क्यूबामध्ये चक्रीवादळाचा प्रभाव सुरू झाला. तर बुधवारी बहामास येथे चक्रीवादळीय स्थिती निर्माण होणार आहे. टर्क्स अँड केकोस बेटांमध्येही बुधवारी जोरदार वारे आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Advertisement
Tags :

.