रुट, अॅटकिनसन यांची दमदार शतके
दुसरी कसोटी, इंग्लंड सर्व बाद 427, लंकेची घसरण
वृत्तसंस्था/लंडन
जो रुट आणि गस अॅटकिनसन यांच्या दमदार शतकांच्या जोरावर यजमान इंग्लंडने येथे सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटीत लंकेविरुद्ध पहिल्या डावात 427 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर लंकेची पहिल्या डावात स्थिती 3 बाद 45 अशी केविलवाणी झाली होती. या दुसऱ्या कसोटीत लंकेने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजी दिली. लंकेच्या असिता फर्नांडोने शानदार गोलंदाजी करत 102 धावांत 5 गडी बाद केले. पण अनुभवी जो रुट आणि अॅटकिनसन या जोडीने सातव्या गड्यासाठी 92 धावांची भागिदारी केली. सलामीच्या डकेटने 47 चेंडूत 4 चौकारांसह 40 धावा जमविल्या. लॉरेन्सने 9 ते पोपने 1 धाव जमविली. डकेट आणि रुट यांनी तिसऱ्या गड्यासाठी 40 धावांची भर घातली. डकेट बाद झाल्यानंतर ब्रुकने रुटला बऱ्यापैकी साथ देताना चौथ्या गड्यासाठी 48 धावांची भागिदारी केली. ब्रुकने 45 चेंडूत 5 चौकारांसह 31 धावा जमविल्या. रुट एका बाजूने संघाची बाजू सावरत होता. जेमी स्मिथने रुट समवेत पाचव्या गड्यासाठी 62 धावांची भागिदारी केली.
इंग्लंड प.डाव 102 षटकात सर्वबाद 427 (रुट 143, अॅटकिनसन 118, डकेट 40, ब्रुक 33, वोक्स 21, पॉटस् 21, स्टोन 15, अवांतर 13, असिता फर्नांडो 5-102, रत्नायके 2-89, कुमारा 2-101, जयसुर्या 1-96) लंका प. डाव (उपाहारापर्यंत) 12 षटकात 3 बाद 45 ( मधुश्का 7, करुणारत्ने 7, निशांका 12, मॅथ्युज खेळत आहे 8, चंडीमल खेळत आहे 3, अवांतर 8, स्टोन 2-15, वोक्स 1-15)