रजत पाटीदार, यश राठोड यांची दमदार शतके
235 धावांच्या आघाडीसह मध्य विभाग भक्कम स्थितीत
वृत्तसंस्था / बेंगळूर
2025 च्या दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेतील येथे सुरू असलेल्या अंतिम सामन्यात शुक्रवारी खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर मध्य विभागाने पहिल्या डावात 5 बाद 384 धावा जमवित दक्षिण विभागावर 235 धावांची भक्कम आघाडी मिळविली. कर्णधार रजत पाटीदार आणि यश राठोड यांनी दमदार शतके झळकविली.
या सामन्यात खेळाच्या पहिल्या दिवशी दक्षिण विभागाचा पहिला डाव 149 धावांत आटोपल्यानंतर मध्य विभागाने बिनबाद 50 या धावसंख्येवरुन दुसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. उपाहारापर्यंतच्या पहिल्या सत्रात मध्य विभागाने 102 धावा जमविताना तीन गडी गमविले. उपाहारावेळी मध्य विभागाने पहिल्या डावात 49 षटकात 3 बाद 152 धावा जमविल्या होत्या. तत्पूर्वी मध्य विभागाचे तीन फलंदाज 93 धावांत बाद झाले होते. सलामीचा दानिश मालेवार 53 धावांवर, अक्षय वाडकर 22 तर शुभम शर्मा 6 धावांवर तंबूत परतले. दक्षिण विभागाचा वेगवान गोलंदाज गुरूजपनित सिंगने या पहिल्या सत्रात मालेवार आणि शुभम शर्मा यांना बाद केले. तर वासुकी कौशिकने वाडकरचा बळी मिळविला.
उपाहारानंतर खेळपट्टी फलंदाजीस अनकुल होत असल्याने त्याचा लाभ कर्णधार रजत पाटीदार आणि यश राठोड यांनी उठविला. पाटीदार आणि राठोड यांनी चौथ्या गड्यासाठी 167 धावांची भागिदारी केली. रजतने भुईच्या गोलंदाजीवर स्वीपचा चौकार ठोकून दक्षिण विभागाची धावसंख्या ओलांडली. पाटीदार आणि राठोड यांनी खेळाच्या दुसऱ्या सत्रात 124 धावा झोडपल्या. पाटीदारने भुईच्या एका षटकात दोन चौकार आणि एक षटकार मारला. त्यानंतर त्याने गुरूजपनित सिंगच्या गोलंदाजीवर सलग चौकार आणि षटकार खेचत 90 च्या घरात प्रवेश केला. पाटीदारने अंकित शर्माच्या गोलंदाजीवर एकेरी धाव घेत आपले शतक 112 चेंडूत 2 षटकार आणि 12 चौकारांच्या मदतीने झळकविले. रजतने अर्धशतक 73 चेंडूत तर दुसरे अर्धशतक केवळ 39 चेंडूत गाठले. शतक पूर्ण झाल्यानंतर गुरूजपनित सिंगने पाटीदारला अझहरुद्दीनकरवी झेलबाद केले. पाटीदारने 115 चेंडूत 2 षटकार आणि 12 चौकारांसह 101 धावा जमविल्या. पाटीदारचे हे प्रथमश्रेणी क्रिकेटमधील 15 वे शतक आहे. चहापानापूर्वी मध्य विभागाने आणखी एक गडी गमविला. निधेशने उपेंद्र यादवला 5 धावांवर बाद केले. चहापानावेळी मध्य विभागाने 72 षटकात 5 बाद 276 धावा जमविल्या होत्या.
खेळाच्या शेवटच्या सत्रात यश राठोडने आपले प्रथमश्रेणी क्रिकेटमधील सातवे शतक 132 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने झळकविले. सारांश जैनने त्याला चांगली साथ दिली. या जोडीने सहाव्या गड्यासाठी अभेद्य 118 धावांची भागिदारी केली. दिवसअखेर मध्य विभागाने 104 षटकात 5 बाद 384 धावा जमविल्या. राठोड 1 षटकार आणि 11 चौकारांसह 137 तर सारांश जैन 6 चौकारांसह 47 धावांवर खेळत आहे. दक्षिण विभागातर्फे गुरूजपनित सिंगने 74 धावांत 3 तर निधेश आणि कौशिक यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक: दक्षिण विभाग प. डाव सर्व बाद 149, मध्यविभाग प. डाव 104 षटकात 5 बाद 384 (रजत पाटीदार 101, यश राठोड खेळत आहे 137, सारांश जैन खेळत आहे 47, अजय वाडकर 52, दानिश मालेक्ाार 53, शुभम शर्मा 6, उपेंद्र यादव 5, गुरूजपनित सिंग 3-74, निधेश व कौशिक प्रत्येकी 1 बळी)