कर्णधार शांतो, मुश्फिकर यांची दमदार शतके
अभेद्य द्विशतकी भागिदारी, लंका प. डाव 3 बाद 293
वृत्तसंस्था / गॅले
मंगळवारपासून येथे सुरू झालेल्या यजमान लंका आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या क्रिकेट कसोटीत कर्णधार नजमुल हुसेन शांतो आणि मुश्फिकुर रहीम यांच्या दमदार नाबाद शतकांनी तसेच अभेद्य द्विशतकी भागिदारीने बांगलादेशचा डाव सावरला. दिवसअखेर बांगलादेशने 90 षटकात 3 बाद 292 धावा जमविल्या. शांतो आणि मुश्फिकुर यांनी चौथ्या गड्यासाठी अभेद्य 247 धावांची भागिदारी केली.
2025-27 च्या आयसीसी विश्वचषक कसोटी चॅम्पियनशिप सायकलला या सामन्याने प्रारंभ झाला आहे. या कसोटीत बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण लंकेच्या गोलंदाजांनी उपाहारापर्यंतच्या पहिल्या सत्रात भेदक गोलंदाजी करत बांगलादेशचे तीन फलंदाज बाद केले. उपाहारावेळी बांगलादेशने 28 षटकात 3 बाद 90 धावा जमविल्या होत्या.
बांगलादेशच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. पाचव्या षटकातील तिसऱ्याच चेंडूवर असिता फर्नांडोने सलामीच्या अनामुल हक्कला खाते उघडण्यापूर्वी कमिंदु मेंडीस करवी झेलबाद केले. 15 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर रत्ननायकेने सलामीच्या शदमान इस्लामला डिसिल्वाकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याने 53 चेंडूत 1 चौकारासह 14 धावा जमविल्या. उपाहारापूर्वी बांगलादेशने आणखी एक गडी गमविला. तिसऱ्या स्थानावर फलंदाजीस आलेला मोमिनुल हक्क रत्ननायकेच्या गोलंदाजीवर डिसिल्वाकरवी झेलबाद झाला. हक्कने 33 चेंडूत 4 चौकारांसह 29 धावा जमविल्या होत्या.
खेळाच्या पहिल्या दिवसातील शेवटच्या दोन सत्रामध्ये लंकेची गोलंदाजी प्रभावी ठरु शकली नाही. कर्णधार नजमुल हुसेन शांतो आणि मुश्फिकुर रहीम यांनी चिवट फलंदाजी करत संघाचा डाव सावरला. चहापानापर्यंतच्या सत्रात बांगलादेशने 92 धावांची भर घातली. चहापानावेळी बांगलादेशने 58 षटकात 3 बाद 182 धावा जमविल्या होत्या. शांतो 70 तर रहीम 66 धावांवर खेळत होते. शांतोने 107 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह तर रहीमने 84 चेंडूत 3 चौकारांसह अर्धशतक झळकविले.
द्विशतकीय भागिदारी
कर्णधार शांतो आणि मुश्फिकुर रहीम यांनी या शेवटच्या सत्रामध्ये आपली दमदार शतके नोंदवून संघाला भक्कम स्थितीत नेले. या जोडीने चौथ्या गड्यासाठी अभेद्य 247 धावांची भागिदारी केली. नजमुल हुसेन शांतोने 202 चेंडूत 1 षटकार आणि 11 चौकारांसह तर मुश्फिकुर रहीमने 176 चेंडूत 5 चौकारांसह शतक झळकविले. शांतो 260 चेंडूत 1 षटकार आणि 14 चौकारांसह 136 तर रहीम 186 चेंडूत 5 चौकारांसह 105 धावांवर खेळत आहे. खेळाच्या या शेवटच्या सत्रामध्ये बांगलादेशने 110 धावा जमविल्या. लंकेतर्फे रत्ननायकेने 124 धावांत 2 तर असिता फर्नांडोने 51 धावांत 1 गडी बाद केला.
कसोटी क्रिकेटमध्ये बांगलादेशतर्फे लंकेविरुद्ध चौथ्या गड्यासाठीची ही सर्वोच्च भागिदारी आहे. यापूर्वी म्हणजे 2018 साली बांगलादेशतर्फे लिटॉन दास आणि मोमिनुल हक यांनी 180 धावांची शतकी भागिदारी केली होती. कर्णधार शांतोचे हे कसोटीतील सातवे शतक आहे. तर मुश्फिकुर रहीमचे हे कसोटीतील 12 वे शतक आहे. या सामन्यासाठी लंकन संघामध्ये दोन खेळाडूंनी आपले कसोटी पदार्पण केले आहे. 31 वर्षीय लाहीरु उदारा आणि मिलन रत्ननायके यांची ही पहिलीच कसोटी आहे. लंकेचा कर्णधार अॅन्जेलो मॅथ्युजची ही 119 वी आणि शेवटची कसोटी आहे.
संक्षिप्त धावफलक: बांगलादेश प. डाव 90 षटकात 3 बाद 292 (नजमुल हुसेन शांतो खेळत आहे 136, मुश्फिकुर रहीम खेळत आहे 105, मोमिनुल हक 29, अनामुल हमक 0, शदमान इस्लाम 14, अवांतर 8, रत्ननायके 2-124, असिता फर्नांडो 1-51)