For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कर्णधार मसूद, शफिक यांची दमदार शतके

06:45 AM Oct 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
कर्णधार मसूद  शफिक यांची दमदार शतके
Advertisement

पहिली कसोटी पहिला दिवस, पाक प. डाव 4 बाद 328

Advertisement

वृत्तसंस्था / मुल्तान

सोमवारपासून येथे सुरू झालेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत पहिल्या दिवसाअखेर कर्णधार शान मसूद आणि अब्दुल्ला शफिक यांच्या दमदार शतकांच्या जोरावर यजमान पाकने इंग्लंड विरुद्ध पहिल्या डावात 4 बाद 328 धावा जमविल्या. उभय संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जाणार आहे.

Advertisement

या सामन्यात पाकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. चौथ्या षटकातील चौथ्या चेंडूवर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज अॅटकिनसनने सलामीच्या सईम आयुबला स्मिथकरवी झेलबाद केले. त्यानंतर मात्र इंग्लंडच्या गोलंदाजीची पाकच्या फलंदाजांनी चांगलीच धुलाई केली. अब्दुल्ला शफिक आणि कर्णधार शान मसूद यांनी संघाला सुस्थितीत नेले. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 253 धावांची द्विशतकी भागिदारी केली.

पाकने उपाहारापर्यंत 25 षटकात 1 बाद 122 धावा जमविल्या होत्या. यावेळी शफीक 53 तर मसूद 61 धावांवर खेळत होते. मसूदने 43 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने तर शफीकने 77 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने अर्धशतके झळकविली. या जोडीने शतकी भागिदारी 118 चेंडूत नोंदविली.

उपाहारानंतर चहापानापर्यंतच्या दुसऱ्या सत्रामध्ये पाकने 111 धावा जमविल्या. या सत्रात शफिक आणि मसूद यांनी दीडशतकी भागिदारी 193 चेंडूत पूर्ण केली. दरम्यान शान मसूदने आपले शतक 102 चेंडूत 2 षटकार आणि 10 चौकारांच्या मदतीने झळकविले. या जोडीने द्विशतकी भागिदारी 244 चेंडूत नोंदविली. चहापानावेळी पाकची स्थिती 52 षटकात 1 बाद 233 अशी मजबूत होती. शान मसूद 130 तर शफिक 94 धावांवर खेळत होते.

शेवटच्या सत्राला प्रारंभ झाल्यानंतर शफीकने आपले शतक 165 चेंडूत 2 षटकार आणि 10 चौकारांच्या मदतीने झळकविले. या जोडीने 250 धावांची भागिदारी 324 चेंडूत पूर्ण केली. शान मसूदने आपले दीडशतक 166 चेंडूत 2 षटकार आणि 13 चौकारांच्या मदतीने पूर्ण केले. शतक पूर्ण झाल्यानंतर अॅटकिनसनने शफीकला पोपकरवी झेलबाद केले. शफीकने 184 चेंडूत 2 षटकार आणि 10 चौकारांसह 102 धावा जमविताना मसूदसमवेत दुसऱ्या गड्यासाठी 253 धावांची भागिदारी केली. शफीक बाद झाल्यानंतर मसूदही पाठोपाठ तंबूत परतला. लीचने स्वत:च्याच गोलंदाजीवर मसूदला टिपले. त्याने 177 चेंडूत 2 षकटार आणि 13 चौकारांसह 151 धावा जमविल्या.

माजी कर्णधार बाबर आझम आणि सौद शकील यांनी चौथ्या गड्यासाठी 61 धावांची भागिदारी केली. इंग्लंडच्या वोक्सने बाबर आझमला पायचित केले. त्याने 71 चेंडूत 5 चौकारांसह 30 धावा जमविल्या. सौद शकील 5 चौकारांसह 35 धावांवर खेळत असून नसीम शहाने अद्याप खाते उघडलेले नाही. पाकने दिवसअखेर पहिल्या डावात 86 षटकात 4 बाद 288 धावा जमविल्या. अॅटकिनसनने 70 धावांत 2 तर वोक्स आणि लिच यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

या सामन्यात सोमवारी पहिल्या दिवशी शेवटच्या सत्रामध्ये पाकचे 3 गडी बाद झाले. शान मसूदचे चार वर्षांनंतर कसोटीतील हे पहिले शतक आहे. यापूर्वी म्हणजे 2020 साली इंग्लंड विरुद्ध मँचेस्टरमध्ये त्याने शेवटचे शतक झळकविले होते. शफीकने षटकार खेचूनच आपले शतक पूर्ण केले. या सामन्यात इंग्लंडतर्फे कार्सेने आपले कसोटी पदार्पण केले आहे.

संक्षिप्त धावफलक : पाक प. डाव 86 षटकात 4 बाद 328 (अब्दुल्ला शफिक 102, सईम अयुब 4, शान मसूद 151, बाबर आझम 30, सौद शकील खेळत आहे 35, अवांतर 6, अॅटकिनसन 2-70, वोक्स 1-58, लीच 1-61)

Advertisement
Tags :

.