पूर्वसूचना न देताच शहरातील वीजपुरवठा खंडित
उद्योग, व्यवसायासह नोकरदारांना बसतोय फटका
प्रतिनिधी/ बेळगाव
हेस्कॉमच्या गलथान कारभाराचा फटका नागरिकांना वरचेवर बसत असतो. मंगळवारी शहरातील काही भागात कोणतीही पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित करण्यात आला. यामुळे उद्योग, व्यवसाय व वर्कफ्रॉम होम करणाऱ्यांची गैरसोय झाली. सायंकाळपर्यंत वीजपुरवठा नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.
दुरुस्तीसाठी दि. 9 रोजी शहरातील वीजपुरवठा बंद ठेवला जाणार असल्याचे हेस्कॉमकडून सांगण्यात आले होते. परंतु सोमवारीही दीड ते दोन तास वीजपुरवठा ठप्प होता. रविवारी ताशिलदार गल्ली, भांदूर गल्ली, रविवारपेठ या भागात अचानक वीजपुरवठा गुल झाला. कोणतीही पूर्वसूचना नसताना वीजपुरवठा ठप्प झाल्याने नागरिकांनी हेस्कॉम कार्यालयात फोनाफोनी सुरू केली. परंतु दुरुस्तीसाठी वीजपुरवठा बंद केल्याचे कारण देण्यात आले. मंगळवारी रविवारपेठेतील मुख्य बाजारपेठ बंद असली तरी उर्वरीत उद्योग, व्यवसाय सुरू होते. त्यामुळे त्यांना 4 वाजेपर्यंत कोणतेही काम नसताना बसावे लागले. आधीच व्यवसाय नसल्यामुळे पिचलेल्या व्यावसायिकांना आता विजेअभावी कामगारांना पगार द्यावा लागत आहे. त्यामुळे हेस्कॉमच्या कृतीविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
वर्कफ्रॉम होम करणाऱ्यांची गैरसोय
कोरोनानंतर वर्कफ्रॉम होम करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यासाठी इंटरनेट व विजेची आवश्यकता आहे. इंटरनेट व वीज असेल तरच त्यांचे काम चालते. एखादी ऑनलाईन मिटिंग चुकली तर त्या दिवशीचा पगारही त्यांना दिला जात नाही. हेस्कॉमच्या अनागोंदी कारभारामुळे वर्कफ्रॉम होम करणारे युवक अडचणीत येत आहेत.