For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऐन गणेशोत्सवात वीज वितरणचे विघ्न

05:45 PM Sep 03, 2025 IST | Radhika Patil
ऐन गणेशोत्सवात वीज वितरणचे विघ्न
Advertisement

कराड :

Advertisement

मंगळवारी गौरी व पाच, सात दिवसांच्या गणपतींचे विसर्जन होते, तर ओगलेवाडी परिसरातील १० ते १२ गणेश मंडळांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. अशावेळी वीज वितरणने सकाळी ९ पासून ओगलेवाडी विभागातील वीजपुरवठा बंद केल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. तर घरोघरी महिलांना अंधारात गौरी विसर्जन करावे लागले. याबाबत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरल्यानंतर दुपारी दीड वाजता वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.

सध्या गणेशोत्सव सुरू असल्याने सर्वत्र आनंद, उत्साह व चैतन्यमय वातावरण आहे. अशा महत्त्वाच्या उत्सव काळात राज्यात सर्वत्र सुरळीत वीजपुरवठा करण्याचे सरकारचे आदेश आहेत. वीज वितरणच्या ओगलेवाडी विभागाने मात्र या आदेशाला हरताळ फासत मंगळवारी गणेशोत्सवाच्या आनंदराव विरझण पाडले. मंगळवारी सकाळी घरोघरी महिलांची गौरी विसर्जनाची लगबग सुरू असतानाच वीज पुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे महिलांना गैरसोयीचा सामना करावा लागला. यावर्षी गौराई दोन दिवस उशिरा आल्याने मंगळवारी गौराईसोबत पाच व सात दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले. अशावेळी वीजपुरवठा बंद असल्याने पाणी, नैवेद्य व प्रसाद करणे आदी कामांत व्यत्यय आला.

Advertisement

गणेशोत्सवात सातव्या दिवसापासून पुढचे तीन दिवस मंडळांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. मंगळवारी ओगलेवाडी परिसरात जवळपास दहा ते बारा मंडळांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. सकाळपासूनच वीजपुरवठा बंद केल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागला.

याची माहिती मिळाल्यानंतर प्रशांत यादव, बाबरमाचीचे माजी उपसरपंच सुरेश पाटील, शिवसेना ठाकरे पक्षाचे ओगलेवाडी विभागप्रमुख जीवन गायकवाड आदींनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांनीही अधिकाऱ्यांशी संपर्क साधत तत्काळ वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या. यानंतर दुपारी दीड वाजता वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

  • उत्सव काळात वीज बंद केली तर उग्र आंदोलन

सध्या गणेशोत्सव सुरू आहे तर नवरात्रोत्सव तोंडावर आला आहे. अशा उत्सव काळात वीजपुरवठा सुरळीत करावा; अन्यथा वीज वितरणविरोधात उग्र आंदोलन करण्यात येईल. वीज वितरणने उत्सवाचे नियोजन करून देखभाल दुरुस्तीची कामे करावीत.

                                                                                  - प्रशांत यादव, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस

Advertisement
Tags :

.