कोकणात वर्चस्वाच्या लढाईसाठी सत्तासंघर्ष
नगरपालिका निवडणुकांमध्ये हळूहळू राजकीय वातावरण तापू लागले आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात महायुती होऊ शकते. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती का नाही, असा प्रश्न उपस्थित करत शिंदे शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. सिंधुदुर्गात युती न होण्यामागे खासदार नारायण राणे यांचे वर्चस्व कमी होऊ देण्याचे कारण तर नाही ना, असा राजकीय सूर उमटला आहे. त्यामुळेच की काय शिंदे शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी आक्रमक होत सिंधुदुर्गात युती न होण्यामागे थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोप केला आहे. त्यामुळे कोकणात शिंदे शिवसेना व भाजपमध्येच नगरपालिका निवडणुकीत रणधुमाळीचा धुरळा उडाला आहे. रणधुमाळीच्या या वर्चस्वाच्या लढाईत कोण बाजी मारणार, याची उत्सुकता लागली आहे.
गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असून पहिल्या टप्प्यातील नगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणे आणि मागे घेणे हा कार्यक्रम संपल्यानंतर आता निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यात शिंदे शिवसेना आणि भाजपने एकत्र येत युती केली आहे. महाविकास आघाडीमध्ये मात्र बिघाडी झाली असून महाविकास आघाडीमधून काँग्रेस बाहेर पडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र उलट परिस्थिती असून शिंदे शिवसेना आणि भाजप एकमेकांविरुद्ध उभी ठाकली आहे. तसेच महाविकास आघाडीतही बिघाडी झालेली असून केवळ मालवणात ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आली आहे. तर कणकवलीत भाजप विरुद्ध सर्वपक्षीय एकत्र येत शहर विकास आघाडी केलेली आहे.
नगरपालिका निवडणुकांमध्ये आता प्रचाराची रणधुमाळी सुरू झाल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे. प्रचारासाठी मंत्री उदय सामंत, नीतेश राणे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उतरले आहेत. त्या-त्या भागातील आमदारांनीही ठाण मांडत प्रचाराची धुरा हाती घेतली आहे. दोन्ही जिल्ह्यात प्रचारसभांना सुरुवात झाली आहे. ही प्रचाराची रणधुमाळी सुरू असतांनाच सिंधुदुर्गात युती न झाल्याने शिंदे सेना व भाजपमध्ये जोरदार सत्तासंघर्ष सुरू आहे. शिंदे सेनेचे आमदार नीलेश राणे, आमदार दीपक केसरकर या दोघांनीही युती होण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, भाजपकडून हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही, असा आरोप त्यांच्याकडून सातत्याने होत आहे. युती तुटण्यामागे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हेच जबाबदार असल्याचा थेट आरोप आमदार नीलेश राणे यांनी केला आहे. त्यामुळे शिंदे सेना आणि भाजपमध्ये अधिकच राजकीय संबंध ताणल्याचे दिसू लागले आहेत. एकमेकांना आव्हाने प्रतिआव्हाने दिली जात आहेत. खासदार नारायण राणे यांनी युती झाली पाहिजे, असे मत व्यक्त केले होते. त्यामुळे रत्नागिरीप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही युती व्हायला हवी होती असे मत व्यक्त करत आता युती तुटलीच आहे तर शांत न बसता सर्व नगरपालिकांवर भगवा फडकवणार, असा निर्धार आमदार नीलेश राणे यांनी केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांची
प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
सिंधुदुर्गात युती न झाल्याने एकीकडे नीलेश राणे यांनी नगरपालिकांवर भगवा फडकविण्याचा निर्धार केलेला असला तरी त्यांचेच धाकटे बंधू मंत्री नीतेश राणे यांनीही चारही नगरपरिषदांवर भाजपचे कमळ फुलविण्याचा चंग बांधला आहे. आम्ही टिकाटिपण्णी करण्यापेक्षा विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवत असल्याचे ते सांगत आहेत. त्यामुळे या नगरपालिका निवडणुकीनिमित्ताने दोन्ही राणे बंधू एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे दिसत आहे. खरंतर कोकणात 1990 पासून खासदार नारायण राणे यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे जिथे राणे तिथे सत्ता असे समीकरण जुळले आहे. राणेंमुळेच 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये कधी नव्हे ते भाजपला रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विजय मिळविता आला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही राणे बंधुंना विजय मिळविता आला. मात्र, नीतेश राणे भाजपमधून आणि नीलेश राणे शिंदे शिवसेनेमधून निवडून आले. त्यावेळी लोकसभा व विधानसभेला महायुती होती. हीच महायुती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अपेक्षित असताना ती होऊ न शकल्याने नीलेश राणे आक्रमक झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणवर अनेक वर्षांपासून राणेंचे असलेले वर्चस्व कमी करण्याच्या दृष्टीने भाजपमधूनच अंतर्गत राजकीय खेळी केली जाते की काय, अशी चर्चा राजकीय तज्ञांमध्ये सुरू आहे. राणेंच्या या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात युती होण्यासाठी मनापासून प्रयत्न झालेले नाहीत. याची खदखद नीलेश राणे यांच्या मनामध्ये होती. त्यामुळे युती न होण्यामागे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जबाबदार असल्याचा आरोप केलेला आहे. चव्हाण हे डोंबिवलीतून विधानसभेवर निवडून येत असले तरी ते सिंधुदुर्गचे सुपुत्र असून गेल्या काही
वर्षापासून ते सिंधुदुर्गच्या राजकारणात लक्ष घालू लागले आहेत. यापूर्वीच्या सावंतवाडी नगरपरिषद किंवा वेंगुर्ले नगरपरिषद तसेच जिल्हा बँक यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळवून देण्यात ‘किंगमेकर’ ठरले होते. मागील युती सरकारच्या काळात ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्रीही होते. त्यामुळे या जिल्ह्यात रवींद्र चव्हाण यांनी आपले हळूहळू वर्चस्व निर्माण करायला सुरुवात केलेली आहे. हा सर्व राजकीय परिपाक म्हणूनच युती न होण्यामागे त्यांचेच नाव घेतले जात आहे.
दुसरीकडे पालकमंत्री नीतेश राणे यांनीही स्वत:चे वर्चस्व निर्माण केले असून मंत्रीपद मिळाल्यापासून त्यांनी अधिकच विकासात्मक कामांकडे लक्ष घातले आहे. कडवा हिंदुत्ववादी नेता म्हणूनही वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे सिंधुदुर्गच्या किंवा कोकणच्या राजकारणात खासदार राणे यांचे वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न होत असला तरी त्यांचे दोन नंबरचे सुपुत्र मंत्री राणे हेदेखील आपले वर्चस्व निर्माण करत आहेत. त्यामुळे नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपने बाजी मारल्यास त्यांचे राज्यात राजकीय वजन वाढेलच. त्याचबरोबर आगामी वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये शतप्रतिशत भाजपचा नारा पूर्ण करण्यासाठी व त्यांच्या राजकीय करिअरसाठी पूरक ठरू शकते. त्यामुळे नगरपालिकांच्या निवडणुकीत मोठा भाऊ की छोटा भाऊ बाजी मारतो किंवा या दोन भावांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होतो, हे आता नगरपालिका निवडणुकीनंतर निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
नगरपालिका निवडणुकांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात महाविकास आघाडीत फूट पडलेली दिसते. रत्नागिरी जिल्ह्यातील चार नगरपरिषद व तीन नगरपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. रत्नागिरी नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गट व भाजप अशी युती झाली आहे. तर ठाकरे शिवसेनेकडून निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. देवरुख, गुहागर आणि लांजा या नगरपंचायतींची निवडणूक युती करूनच लढविली जात आहे. खेड नगरपालिका निवडणुकीत भाजपचे वैभव खेडेकर, माजी मंत्री रामदास कदम व मंत्री योगेश कदम यांनी एकत्र येत महायुतीतून ही निवडणूक लढविली जात आहे. राजापूर नगरपरिषद निवडणुकीत माजी आमदार हुस्नबानू खलिपे काँग्रेसतर्फे निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. तर चिपळूण नगरपरिषदेच्या निवडणुकीत माजी आमदार, माजी नगराध्यक्ष रमेश कदम हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. चिपळूण मध्ये ठाकरे सेनेचे आमदार भास्कर जाधव हे रमेश कदम यांच्यासोबत आहेत. त्यामुळे या ठिकाणी ठाकरे सेनेचे माजी खासदार विनायक राऊत आणि भास्कर जाधव यांच्यामध्येच राजकीय संघर्ष सुरू झालेला आहे.
रत्नागिरी नगरपरिषदेत शिवसेना-भाजप युती, ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशी लढत होत आहे. देवरुख आणि गुहागर या नगरपंचायतीत नगराध्यक्षपद जागा भाजपला देण्यात आली आहे. लांजा नगरपंचायत आणि राजापूर, रत्नागिरी, चिपळूण या नगरपरिषदांचे नगराध्यक्षपद महायुतीतील शिंदे सेनेला दिले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, वेंगुर्ले आणि मालवण या तीन नगरपरिषदा आणि कणकवली नगरपंचायतीची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत महायुती होऊ शकलेली नाही किंवा महाविकास आघाडीही होऊ शकलेली नाही. त्यामुळे सर्वच पक्षांनी स्वबळाचा नारा दिलेला आहे. केवळ मालवणमध्ये ठाकरे सेना व काँग्रेस एकत्र आलेले आहेत. सर्वांच्या केंद्रस्थानी ठरलेल्या कणकवली नगरपंचायतीमध्ये भाजप विरुद्ध शहर विकास आघाडी निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे या शहर विकास आघाडीमध्ये ठाकरे सेना व शिंदे सेना एकत्र आली आहे. त्यामुळे कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहेत. या शहर विकास आघाडीमध्ये नगराध्यक्षपदाचे उमेदवार हे ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर आहेत. असे असले तरी त्यांच्या प्रचारासाठी शिंदे सेनेचे मंत्री उदय सामंत, आमदार नीलेश राणे, माजी आमदार राजन तेली मैदानात उतरले आहेत. त्यामुळे भाजपचे नीतेश राणे यांना एकट्यालाच खिंड लढवावी लागणार आहे. संपूर्ण राज्याच्या राजकारणात कणकवली नगरपंचायतीची निवडणूक केंद्रस्थानी ठरली असून या निवडणुकीचा निकालही तेवढाच दूरगामी राजकीय परिणाम करणारा ठरू शकतो.
संदीप गावडे