कोळशापासून वीज उत्पादन 7 टक्क्यांनी वाढले
देशातील वीज उत्पादनाचा समावेश : चालू आर्थिक वर्षातील पहिल्या 9 महिन्यांची स्थिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 9 महिन्यात देशांतर्गत कोळसा-आधारित ऊर्जा प्रकल्पातील उत्पादन 7.14 टक्क्यांनी वाढून 872 अब्ज युनिट्सवर पोहोचले आहे. कोळसा मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, देशांतर्गत कोळशावर आधारित वीजनिर्मिती वाढल्याने देशातील वाढती उर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी कोळशाचा पुरेसा पुरवठा दिसून येतो.
वर्षभरापूर्वी याच कालावधीत देशांतर्गत कोळशावर आधारित वीजनिर्मिती 813.9 अब्ज युनिट होती. थर्मल-इलेक्ट्रिक पॉवर युनिट्स चालवण्यासाठी मुख्य इंधन म्हणून कोळसा वापरला जातो. एकूण वीज उत्पादनात औष्णिक विजेचा वाटा 70 टक्क्यांहून अधिक आहे.
मंत्रालयाने म्हटले आहे की 2023-24 या आर्थिक वर्षाच्या एप्रिल-डिसेंबर कालावधीत कोळशावर आधारित वीजनिर्मिती मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 10.13 टक्क्यांनी वाढली आहे. एप्रिल-डिसेंबर 2022 मध्ये वीज उत्पादनात 6.71 टक्क्यांनी वाढ झाली होती. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-डिसेंबर या कालावधीत, वीज निर्मिती युनिट्समध्ये मिश्रित करण्यासाठी कोळशाची आयात 40.66 टक्क्यांनी घटून 1.70 कोटी टन झाली आहे.
गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत 2.87 कोटी टन कोळसा आयात करण्यात आला होता. भारताची उर्जेची मागणी पूर्ण करण्यात कोळशावर आधारित वीजनिर्मितीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. औद्योगिक वाढ, तांत्रिक प्रगती, लोकसंख्या वाढ आणि आर्थिक विकास या कारणांमुळे विजेची मागणी वाढली आहे.