Powala Snake : आटपाडीत सापडला अतिविषारी पोवळा साप, विषारी सापांमध्ये लक्षणीय वाढ
आटपाडीसह तालुक्यात विषारी घोणस, मण्यार हे साप आढळतात
By : सूरज मुल्ला
आटपाडी : आटपाडी शहरात अत्यंत लहान दुर्मिळ अतिविषारी 'पोवळा' जातीचा साप आढळला. सर्पमित्र संतोष शिंदे यांनी नाथमंदिर परिसरातून आकाराने वाळ्यासारखा दिसणारा अतिविषारी साप पकडून त्याला सुरक्षितरित्या आधिवासात सोडले. पोवळा जातीच्या सापामुळे आटपाडीतील विषारी सापांच्या प्रजाती आढळण्याची मालिका दिवसेंदिवस वाढतच असल्याचे सिद्ध झाले आहे.
कधीकाळी दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आटपाडी तालुक्यात सध्या बदललेले चित्र आहे. दुष्काळाची ओळख पुसून सुकाळी म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या तालुक्यात मात्र मागील काही वर्षांत विषारी सापांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. आटपाडीसह तालुक्यात विषारी घोणस, मण्यार हे साप आढळतात. या सापांच्या दंशामुळे अनेकांचे प्राणही गेले तर अनेकांचे प्राण वाचविण्यात यश आले. काही सर्पमित्रांमुळे धोके टळले आहेत.
आटपाडी शहरात नाथमंदिर परिसरात आकाराने लहान असलेला वाळासदृश्य कधी न पाहिलेला अतिविषारी 'पोवळा' जातीचा साप आढळला. याबाबतची माहिती सर्पमित्र संतोष शिंदे यांना दिली. त्यांनी घटनास्थळी धाव घेवून सुरक्षितरित्या पकडला. यानतंर हा साप पोवळा असल्याचे सिद्ध झाले. हा साप प्रथमच आटपाडी शहर व तालुक्यात आढळला असल्याचे अनेकांचे मत आहे. सरासरी एकवीत लांबीचा, वाळ्यासारख्या आकाराचा, तपकीरी रंगाचा
हा साप सहज दृष्टीस पडत नाही.
पोवळ्याच्या तोंडाजवळ आणि शेपटीजवळही काळा रंग असतो. शिवाय त्या काळ्या रंगात काहींसा पांढरा रंगही असतो. चाहूल लागताच पोवळा आपली शेपटी गोलाकार हलवत वेटोळे घालतो. हा साप लाजाळू असून मातीत आढळतो. शरीराची रचना लहान व मातीच्या आकाराची असल्याने तो विषारी पोवळा आहे, याची जाणीव सहज शक्य नसल्याचे सर्पमित्र संतोष शिंदे यांनी स्पष्ट केले. याच्या नोंदी फक्त पश्चिम घाटातच असून त्याचे प्रमाणही अत्यल्प आहे. परंतु आत्ता त्याचा वावर, अस्तित्त्व आटपाडी शहरासह तालुक्यात वाढल्याची शक्यता नाकारता येत नाही.