बेळगावात ऑक्टोबरमध्ये प्रथमच पोल्ट्री एक्स्पोचे आयोजन
पोल्ट्रीमधील आधुनिक तंत्रज्ञानाची मिळणार माहिती
बेळगाव : शेतीला पूरक व्यवसाय म्हणून कुक्कुट पालनाकडे पाहिले जाते. ग्रामीण भागातील ज्या शेतकऱ्यांना कुक्कुट पालन करावयाचे आहे, त्यांच्यासाठी बेळगावमध्ये भारतीय पोल्ट्री एक्स्पो-2024 भरविण्यात येणार आहे. 7 ते 9 ऑक्टोबरदरम्यान कॉलेज रोड येथील गांधी भवन येथे हा एक्स्पो होणार आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत पोल्ट्री एक्स्पोमध्ये सहभागी होता येणार आहे. शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय मिळावा, यासाठी स्व. पद्मश्री बी. व्ही. राव यांच्या दूरदृष्टीतून कुक्कुट पालनाची संकल्पना तयार झाली. शेतकऱ्यांना नवनवीन माहिती, नवीन तंत्रज्ञान, यंत्रसामग्री यांची माहिती एक्स्पोमधून दिली जाते. त्यामुळे त्यांना कुक्कुट पालन करणे सोयीचे ठरणार आहे.
यापूर्वी विजयवाडा, हैद्राबाद, पाटणा, रायपूर, लखनौ, गोरखपूर, गुवाहाटी, नाशिक अशा 24 ठिकाणी यशस्वी प्रदर्शन भरविले आहे. आता 25 वे प्रदर्शन बेळगावमध्ये होणार आहे. बेळगाव शहर महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकाच्या सीमेवर वसले आहे. त्यामुळे मिरज, सांगली, सातारा, कराड, अथणी, इस्लामपूर, कोल्हापूर, आजरा, गडहिंग्लज, सावंतवाडी, जमखंडी, संकेश्वर, हुबळी-धारवाड यांच्या आसपासच बेळगाव केंद्र आहे. त्यामुळे पोल्ट्री एक्स्पोमधून आसपासच्या शेतकऱ्यांनाही नवीन माहिती घेणे शक्य होणार आहे. शेतकऱ्यांनी पोल्ट्री एक्स्पोबाबतच्या अधिक माहितीसाठी बी. व्ही. शिवशंकर (मो. नं. 9849368003) अथवा यश कम्युनिकेशन (मो. नं. 9341109635) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.