येळ्ळूर-सुळगा-राजहंसगड रस्त्यावरील खड्डे सामाजिक कार्यकर्त्याने बुजविले
लोकप्रतिनिधी-अधिकाऱ्यांना कळवूनही दुरुस्तीकडे दुर्लक्ष : शासनाचा नाकर्तेपणा
वार्ताहर/धामणे
शासनाच्या नाकर्तेपणामुळे कळस गाठला असल्याने येळ्ळूर-सुळगा ते राजहंसगड रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची वेळ सुळगा (ये.) गावच्या सामाजिक कार्यकर्त्यांवर आल्याचा प्रत्यय सोमवार दि. 21 रोजी या रस्त्याने जाणाऱ्या वाहनधारकांना आला आहे. येळ्ळूरपासून सुळगा ते पुढे देसूर, राजहंसगड रस्त्याला जोडणारा हा रस्ता अत्यंत खराब होवून रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने येथून जा-ये करणाऱ्या वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खराब झालेला रस्ता दुरुस्त करण्याबद्दल महिला व बालकल्याण मंत्री व येथील आमदार यांना सुळगा गावकऱ्यांच्यावतीने अनेकवेळा कळविण्यात आले आहे. परंतू त्यांनी या मागणीकडे साफ दुर्लक्ष केल्याने या खराब रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनचालकांचे होणारे हाल पाहून सुळगा (ये.) येथील सामाजिक कार्यकर्त्याने स्वखर्चातून या खराब रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे कार्य करत आहे. स्वत: खर्च करून ट्रॅक्टरच्या सहाय्याने हार्डमुरुम आणून मजूर लावून ते खड्डे बुजविल्याने वाहनधारकांकडून आणि सुळगा गावकऱ्यांकडून त्यांचे कौतुक होत आहे. येळ्ळूरपासून हा रस्ता देसूर ते नंदिहळ्ळी रस्त्याला जोडल्याने या रस्त्याने नंदिहळ्ळी, गर्लगुंजी, तोपिनकट्टी तसेच देसुरमार्गे खानापूर हायवेला जोडल्याने खानापूरकडे जाण्यासाठी धामणे, बस्तवाड, हलगा येथील वाहनधारक येळ्ळूर-सुळगा रस्त्याने ये-जा करतात.