उद्यमबाग रस्त्यावरील खड्डे तात्पुरते बुजविले
बेळगाव : शहराची औद्योगिक वसाहत अशी ओळख असलेल्या उद्यमबाग रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले होते.मागील आठ दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचून वाहन चालक जायबंदी होत होते. वेगाने जाणारी वाहने खड्ड्यांमध्ये अडकुन अपघात होत असल्याने रविवारी या रस्त्यांची तात्पुरती डागडुजी करण्यात आली. तिसरे रेल्वे गेटपासून बेम्को कॉर्नरपर्यंत अनेक ठिकाणी रस्त्यामध्ये खड्डे पडले होते. या रस्त्यावर दरवर्षी खड्डे पडतात. त्यानंतर तात्पुरत्या स्वरुपात प्रशासनाकडून मलमपट्टी केली जाते. परत पुढच्या पावसाळ्यात खड्डे पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. रस्ता मोठा असल्यामुळे दुचाकी तसेच चारचाकी वाहने वेगाने येत असतात. खड्ड्यामध्ये अडकून अनेक ठिकाणी अपघात घडत होते. बेम्को कॉर्नर येथे दुभाजकाशेजारीच रस्त्यामध्ये मोठा खड्डा पडला होता. खबरदारीचा उपाय म्हणून रहदारी पोलिसांनी याठिकाणी बॅरिकेड्स उभा केला होता. या रस्त्यावरून दररोज शेकडो वाहनांची ये-जा असते. उद्यमबागला जाणारा कामगार वर्ग याच रस्त्याचा वापर करतो. खड्डे चुकविताना अनेकांचा नाहक बळी यापूर्वी गेला आहे. त्यामुळे एखादा मोठा अपघात होऊ नये यासाठी तात्पुरत्या स्वरुपात डागडुजी करण्यात आली.