गोगटे सर्कल उड्डाणपुलावर खड्डे
महानगरपालिकेच्या कारभाराबाबत तीव्र संताप
बेळगाव : शहरातील उड्डाणपुलावरील खड्डे काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. तिसरे रेल्वेगेट उड्डाणपुलासोबत आता गोगटे सर्कल येथील उड्डाणपुलावर देखील खड्डे पडले आहेत. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहने चालवताना अडचणी येत आहेत. रात्रीच्या वेळी खड्डे निदर्शनास न आल्याने अपघातही होत आहेत. काही दिवसांपूर्वी नागरिकांनी उड्डाणपुलावर आंदोलन करून प्रशासनाला इशारा दिला होता. आता अशाच प्रकारचे खड्डे गोगटे सर्कल येथील रेल्वे उड्डाणपुलावर पडले आहेत. पावसाच्या पाण्यामुळे खड्डे निदर्शनास येत नसल्यामुळे अपघात होत आहेत. त्यामुळे मनपा कारभाराबाबत संताप व्यक्त होत आहे. दररोज या उड्डाणपुलावरून ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे दुचाकी या खड्ड्यांमध्ये अडकून अपघात होत असल्याने एखाद्या निष्पापाचा बळी जाण्यापूर्वी उड्डाणपुलावरील खड्डे बुजवावे.