रुमेवाडी नाका-करंबळ क्रॉसजवळ खड्यांचे साम्राज्य
तात्पुरती डागडुजी करण्याची मागणी
खानापूर : बेळगाव-पणजी राष्ट्रीय महामार्गापैकी रुमेवाडी क्रॉस ते करबंळ क्रॉसपर्यंतच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर पुन्हा एकदा खड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या परतीच्या जोरदार पावसामुळे खड्यांची संख्या तसेच खोली अधिकच वाढली आहे. या खड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने डबक्याचे स्वरुप निर्माण झाले आहे. पाणी भरलेल्या खड्यांतून वाहन चालवताना वाहनधारकाला कसरत करावी लागत आहे. राजा टाईल्स ते करंबळ क्रॉसपर्यंतचा रस्ता नव्याने करण्यात येत असल्याने या रस्त्याची देखभालच करण्यात येत नसल्याने फिश मार्केट ते करंबळ क्रॉसपर्यंत रस्त्याची पूर्णपणे दुरवस्था झालेली आहे. रुमेवाडी नाका ते करंबळ क्रॉसपर्यंतच्या रस्त्यावर वरचेवर खड्डे पडतात. त्याची तात्पुरती दुरुस्ती होते. पण पुन्हा ये-रे माझ्या मागल्या अशीच अवस्था निर्माण झाली आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने राजा टाईल्स ते करंबळ क्रॉसपर्यंतच्या रस्त्याच्या पुनर्बांधणीसाठी 14 कोटीचा निधी मंजूर केला असल्याने हा रस्ता पूर्णपणे सिमेंट काँक्रीटचा होणार असल्याचे आमदार विठ्ठल हलगेकर सांगत आहेत. मात्र हे काम कधी सुरू होणार याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. अशातच फिशमार्केट ते करंबळ क्रॉसपर्यंत रस्त्याची पूर्णपणे दुरवस्था झाली आहे. रुमेवाडी नाक्यानंतर तर वाहन चालवणे अशक्य झाले आहे. जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने होत असलेल्या पावसाचे पाणी साचत असल्याने या खड्यांतून वाहन चालवणे धोकादायक बनले आहे. त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. रस्त्याचे काम सुरू होईपर्यंत या रस्त्याची तात्पुरती डागडुजी करण्याचे आदेश आमदार विठ्ठल हलेगकर यांनी द्यावेत, अशी मागणी जनतेतून होत आहे.