कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मिरा हौसिंग सोसायटी चौकात खड्डे

05:19 PM Sep 12, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

सांगली / संजय गायकवाड :

Advertisement

सांगलीतील अर्पाटमेंट क्षेत्रातील सर्वात जुनी म्हणून ओळख असलेल्या मिरा हौसिंग सोसायटीजवळील चौकाला धुळ आणि रस्त्यातील खड्डे याचे ग्रहण लागले आहे. मिरा हौसिंग आणि लाले प्लॉटला जोडणाऱ्या स्वर्गीय मदनभाऊ पाटील यांच्या पुतळयाजवळील चौकाकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे.

Advertisement

सांगली शहराची वाढ खऱ्या अर्थाने महापालिकेच्या स्थापनेनंतर मोठ्या प्रमाणात झाली. सांगली, मिरज, कुपवाड या तिन्ही शहरांची मिळून १९९८ ला महापालिका स्थापन झाली. मनपा स्थापन होवून आता जवळपास २७ वर्ष होत आली. या कालावधीत महापालिका क्षेत्राची लोकसंख्या आणि विस्तारही मोठ्या प्रमाणात वाढला. तत्पूर्वी नगरपालिका असताना सांगली हे तुलनेने छोटेसे शहर होते. तरीही सांगलीची वाढ होतच होती. त्या काळात सांगलीमध्ये बांधकाम क्षेत्रात सदनिका अर्थातच अर्पाटमेंट हा व्यवसाय वाढीस लागला होता. साधारणपणे १९८० च्या दरम्यान सांगलीमध्ये ज्या निवासी व व्यावसायिक इमारती उभ्या राहू लागल्या त्यात माधवनगर रोडवरील मिरा हौसिंग सोसायटी या एका मोठ्या अर्पाटमेंटच्या स्कीमचाही समावेश होता.

सांगलीच्या उत्तर शिवाजीनगरचा विस्तार तसा माधवनगर रोडला लाले प्लॉट आणि मिरा हौसिंग सोसायटीपर्यंत आहे. मागील वीस वर्षात या भागात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. माधवनगर रोडला कॉलेज कॉर्नरपासून पुढे अॅटो इंडिया या बजाजच्या शोरूमनंतर दुचाकी गाड्यांची अनेक शोरूम सुरू झाली. त्यामुळे या रोडवरील गजबज मोठ्या प्रमाणात वाढली. सांगली कॉलेजपासून चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपुलाच्या दिशेला दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात व्यापारी संकुले उभी राहू लागली आहेत. त्यामुळे या रोडवर वाहनांची संख्याही वाढली आहे.

कॉलेज कॉर्नरपासून मिरा हौसिंगकडे जाणारी वाहने ही मदनभाऊ पाटील यांच्या पुतळ्याच्या पाठीमागून सोसायटीकडे जातात. तिकडून सद्गुरू वामनराव पै मार्ग आणि सर्कीट हाऊस रोडकडे जाणाऱ्या वाहनांना पोरे अॅटोजसमोरील चौक क्रास करावा लागतो. या चौकाच्या अगदी जवळ असणारा दुसरा चौक म्हणजे मिरा हौसिंग सोसायटीनजीकचा चौक आहे. मिरा हौसिंगच्या पुढे आता तात्यासाहेब मळा, जुने घाटगे हॉस्पिटल, टिंबर एरियाचा विस्तारीत भाग, नवीन पत्रकारनगर तर दुसऱ्या बाजूला टिंबर एरियातील प्रमुख रोडसह लाले प्लॉट, उत्तर शिवाजीनगर, सागंली कॉलेज, व्यंकटेश मंदिर, नवीन वसाहत, रेल्वे स्टेशन रोड असा विस्तार असणारा भाग आहे. या सगळ्या भागातून  ये जा करणाऱ्या सर्व वाहनांना मिरा हौसिंग सोसायटीजवळील चौक क्रॉस करावा लागतो.

बायपास रोडवरील नव्या पुलावरून येणाऱ्या मालमोटारी या मल्टीप्लेक्सपासून सर्कीट हाऊस, पोरेज अॅटोसमोरून मदनभाऊ पाटील यांच्या पुतळ्याच्या पाठीमागून टिंबर एरियाकडे जात असतात. येथून ये जा करणाऱ्या मालमोटारींचे प्रमाण जास्त आहे. याशिवाय रेल्वे स्टेशन आणि टिंबर एरियातून माधवनगरच्या दिशेला जाणाऱ्या रिक्षा, दुचाकी गाडया आणि इतर वाहनेही याच चौकातून पुढे जातात. यामुळे मुख्य माधवनगर रोडप्रमाणेच याही रोडवर वाहनांची संख्या मोठी आहे. मिरा हौसिंगकडून येणारी अनेक वाहने ही भरधावपणे मदनभाऊच्या पुतळ्याच्या समोरून माधवनगर रोडवर येण्याच्या प्रयत्नात अपघाताला कारणीभूत ठरतात. मिरा हौसिंग सोसायटीचा परिसर आणि स्व. मदनभाऊ पाटील यांच्या पुतळ्याच्या सभोवताली रस्त्यावर लहान मोठे खड्डे पडलेले आहेत. यामुळे येथून ये जा करणाऱ्या वाहनांना कमलीचा त्रास सहन करावा लागतो. या भागातील स्थानिक नगरसेवक आणि महापालिकेचेही या चौकातील समस्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. या परिसरात मोकाट कुत्र्यांच्या झुंडी फिरत असतात. येथे डॉग व्हॅन कधी येते व त्यातून किती कुत्री पकडली जातात. हे मनपाच्या आरोग्य विभागालाच माहित. मिरा सोसायटीजवळील खड्डेमय रस्ते, भटकी जनावरे आणि मोकाट कुत्री याचा त्रास होतो. आयुक्तांनी यक्ष चौकातील नागरी समस्या दुर करण्यासाठी पावले उचलावीत अशी मागणी होत आहे.

 

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article