कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बेळगाव-रामघाट रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य

11:33 AM Jul 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रस्त्याच्या दुरुस्तीकडे साफ दुर्लक्ष : वाहन अपघातात वाढ : रस्ता काँक्रिटीकरण करण्याची मागणी 

Advertisement

बेळगाव : पावसाच्या पाण्यामुळे शहर आणि उपनगरातील डांबरी रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. विशेष करून बेळगाव-रामघाट रस्त्याची अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. मिलिटरी हॉस्पिटल ते पाईपलाईन रोड दरम्यान रस्ता कमी आणि खड्डे जास्त अशी अवस्था निर्माण झाली आहे. पावसाचे पाणी खड्ड्यात तुंबून रहात असल्याने वाहनधारकांना खड्ड्याचा अंदाज येणे अवघड झाले आहे. परिणामी लहानमोठे अपघात होत आहेत. शौर्य चौक ते पाईपलाईन रोड दरम्यानची मध्यंतरी दयनीय अवस्था झाली होती. हा रस्ता कॅन्टोन्मेंट बोर्डच्या हद्दीत येतो. मात्र, रस्त्याचे डांबरीकरण किंवा दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. त्यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करत वाहने हाकण्याची वेळ आली होती. त्यानंतर गेल्या सहा महिन्यांपूर्वी शौर्य चौक ते ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्या बंगल्यापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र, तेथून पुढचा पाईपलाईनकडे जाणारा रस्ता दुरुस्त करण्यात आला नाही. पावसाचे पाणी गटारीतून वाहून जाण्याऐवजी रस्त्यावरच तुंबून रहात आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावला पावलावर खड्ड्यांमुळे डबकी निर्माण झाली आहेत.

Advertisement

बेळगाव-रामघाट रोड हा वर्दळीचा आहे. बेळगाव शहराकडे येणारे नागरिक विशेष करून याच रस्त्याचा वापर करतात. चंदगड भागातून येणारे नागरिक देखील रामघाट रोडवरूनच ये-जा करीत असतात. तसेच बेळगुंदी, राकसकोप, गणेशपूर आदी भागातील नागरिक व बसेस त्याचबरोबर इतर प्रकारची वाहने सातत्याने ये-जा करीत असतात. खड्ड्यातून वाट शोधताना वाहनधारकांची दमछाक होत आहे. दरवर्षी त्या ठिकाणी अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होत आहे. तरीदेखील कायमस्वरुपी रस्त्याची समस्या मार्गी लावण्याकडे दुर्लक्ष केले आहे. पावसाचे पाणी तुंबून रहात असल्याने डांबर उखडत आहे. त्यामुळे डांबरीकरणाऐवजी काँक्रिटचा रस्ता केल्यास ही समस्या उद्भवणार नाही, असे मत जाणकारातून व्यक्त केले जात आहे. सदर रस्त्याचा काही भाग सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित येतो. त्यामुळे कॅन्टोन्मेंट आणि सार्वजनिक बांधकाम खात्याने याकडे लक्ष घालून रस्त्याची दुरुस्ती किंवा काँक्रिटीकरण करावे, अशी मागणी केली जात आहे. रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वारंवार लहानमोठे अपघात घडत आहेत. तसेच वाहने नादुरुस्त होण्याचे प्रमाणही वाढले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article