विश्वकप विजेत्या कबड्डीपटू-कोचचा सन्मान
धनलक्ष्मी पुजारी-तेजस्विनींची विधानसभेत उपस्थिती
बेळगाव : ढाका येथे झालेल्या महिला कबड्डी विश्वकप स्पर्धेत सुवर्णपदक मिळविलेल्या भारतीय संघातील खेळाडू धनलक्ष्मी पुजारी व कोच तेजस्विनी यांचे मंगळवारी विधानसभेत अभिनंदन करण्यात आले. मंगळवारी भोजन विरामानंतर धनलक्ष्मी पुजारी व कोच तेजस्विनी या विधानसभेतील सभाध्यक्षांच्या गॅलरीत दाखल झाल्या. सभाध्यक्ष यु. टी. खादर फरीद यांनी सभागृहाला यासंबंधीची माहिती देत त्यांचे अभिनंदन केले व सभागृहात स्वागत केले. धनलक्ष्मी पुजारी यांच्यामुळे कर्नाटकाचा नावलौकिक झाला आहे, अशा शब्दात या खेळाडूंचा गौरव करण्यात आला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही धनलक्ष्मी व कोच तेजस्विनी यांचे अभिनंदन करीत कौतुक केले. याआधीच विश्वकप कबड्डीत सुवर्णपदक मिळविणाऱ्या धनलक्ष्मीला सरकारने पाच लाख रुपये बक्षीस देऊन तिचा गौरव केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावर भाजपच्या आमदारांनी केवळ पाच लाखाने काही होणार नाही. किमान 50 लाख रुपये बक्षीस जाहीर करा, अशी मागणी केली. सभागृहात गौरव करण्याआधी सभाध्यक्ष व मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या दोन्ही खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.