For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बटाटा दरात वाढ, कांदा दर स्थिर

06:02 AM Jan 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
बटाटा दरात वाढ  कांदा दर स्थिर
Advertisement

मटरचा भाव प्रति 10 किलोला 200 रुपयांनी वाढला : इतर भाजीपाल्यांचे दर स्थिर

Advertisement

सुधीर गडकरी/ अगसगे

बेळगाव कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये शनिवारच्या बाजारात इंदोर बटाटा भाव प्रति क्विंटल 200 रुपयांनी, तळेगाव बटाटा 100 रुपयांनी तर आग्रा बटाटा 100 रुपयांनी वाढला आहे. महाराष्ट्र कांदा, कर्नाटक कांदा यांचा भाव मात्र स्थिर आहे. भाजीमार्केटमध्ये बेळगाव हायब्रिड कोथिंबीरचा भाव शेकडा 200 रुपयांनी कमी झाला आहे. तर मटरचा भाव प्रति 10 किलोला 200 रुपयांनी वाढला आहे. तर इतर भाजीपाल्यांचे दर स्थिर आहेत.

Advertisement

बुधवारच्या बाजारात कांदा, बटाटा भाव वाढला होता. कारण देशभरामध्ये ट्रकचालकांनी आंदोलन छेडले होते. यामुळे ट्रक वाहतूक ठप्प झाली होती. मार्केट यार्डमध्ये आवकेत घट निर्माण झाली होती. बुधवारी मार्केट यार्डमध्ये कांदा भाव क्विंटलला 2000 ते 3000 रु. झाला होता. यावेळी बटाटा भावदेखील 200 रुपयांनी वाढला होता. इंदोर बटाट भाव 1800-2300 रुपये झाला होता. मात्र आता ट्रकचालकांनी आंदोलन मागे घेतले आहे. यामुळे भाव पूर्वपदावर येऊन पोहचले आहेत. सध्या इंदोर बटाट मोठवड व गोळा आकाराचा येत आहे. तसेच कर्नाटकातील दुसऱ्या टप्प्यातील नवीन आवक देखील येत आहे. महाराष्ट्र कांदा पाकड येत आहे.

कांदा भाव स्थिर

सध्या महाराष्ट्रातून नवीन कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात येत आहे. तर कर्नाटकातील पांढऱ्या कांद्याची नवीन आवक देखील येत आहे. सध्या देशभरामध्ये महाराष्ट्र कांद्याची आवक विविध बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी जात आहेत. कांदा निर्यातीवर केंद्र सरकारने बंदी घातल्याचा परिणाम एक महिन्यापासून कांदा भाव स्थिर असल्याची माहिती कांदा अडत व्यापाऱ्यांनी दिली.

इंदोर बटाटा पाकड येण्यास प्रारंभ

डिसेंबर महिन्यापासून इंदोर बटाटा बेळगाव बाजारात विक्रीसाठी येत आहे. या ठिकाणी बटाटा व्यापारी शेतकऱ्यांकडून शेतामध्येच जावून संपूर्ण बटाट्याच्या राशीची खरेदी करतात आणि मागणीनुसार पोती भरुन ट्रकद्वारे विविध बाजारात विक्रीसाठी पाठवतात. काढणीनंतर त्वरीत भरल्याने बटाटा कचवड आणि माती लागलेला बटाटा येत होता. यामुळे हा बटाटा आठ-दहा दिवसांमध्येच नरम होत होता. तर काही प्रमाणात खराब देखील होत होता. सध्या काही प्रमाणात बटाटा मोठा आणि पाकड येत आहे, अशी माहिती बटाटा अडत व्यापाऱ्यांनी दिली.

जुन्या इंदोर बटाट्याला मागणी जास्त

सध्या इंदोरचा जुना बटाटा जवळपास संपत आला आहे. काही मोजक्याच इंदोरच्या व्यापाऱ्यांकडे जुना बटाटा शिल्लक आहे. नवीन बटाटा घट्ट आहे. थोडा कचवड आहे. शिजण्यासाठी वेळ लागतो. यामुळे वडापाव, बटाटा वडा, पावभाजी, समोसा बनवण्यासाठी आणि हॉटेलसाठी देखील जुन्या बटाट्याला मागणी आहे. कारण जुना इंदोर बटाटा लवकर शिजतो व वरील खाद्यपदार्थ बनवण्यासाठी उपयुक्त आहे. यामुळे जुना इंदोर बटाटा खरेदीदारांकडून मागणी जास्त आहे, अशी माहिती बटाटा व्यापाऱ्यांनी दिली.

रताळी आवक भरमसाठ

बेळगाव आणि खानापूर तालुक्यामध्ये पावसाळा रताळी लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. कारण बटाटा लागवडीसाठी येणारा भलामोठा खर्च, बियाण्याचे वाढीव दर, उत्पादनासाठी येणारा अधिक खर्च आणि शेवटी उत्पादनानंतर शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जच येत आहे. यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांनी बटाटा लागवडीत कमालीची घट केली होती. कमी खर्चात अधिक उत्पादन मिळवणारे पीक म्हणून रताळ्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यात आले आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी यंदा रताळी उत्पादन मोठ्याने घेतल्याने रताळ्याचे उत्पादन वाढले आहे. बेळगावहून रताळीही परराज्यातील दिल्ली, मुंबई, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणा व महाराष्ट्रामध्ये जातात. सध्या रताळ्याचा भाव क्विंटलला 350-1200 रुपये झाला आहे, अशी माहिती रताळी व्यापाऱ्यांनी दिली.

भाजीपाल्यांचे भाव स्थिरOnion, potato and yam prices remained stable per quintal

गेल्या एक महिन्यापासून भाजीपाल्यांचे दर भडकले आहेत. तेव्हापासून भाजीपाला भाव स्थिर आहेत. यंदा पाऊस नसल्यामुळे नदी, नाल्यांना व विहिरींना पाणी अपुरे पडत आहे. घटप्रभा परिसरातील कॅनॉलना पाणीच नाही. कूपनलिका बंद पडले आहेत. या ठिकाणी भाजीपाल्यांचे उत्पादन 50 टक्क्यांवर येऊन पोहचले आहे. सध्या बेळगाव परिसरातील भाजीपाला आवकेवर टिकून आहे. ढबू मिरची व बटका मिरची मुंबईहून तर बिन्स बेंगळूरहून तर मटर मध्यप्रदेशातून मागविण्यात येत आहे. भाजीमार्केटमध्ये एक नंबर (उत्तम दर्जाचा) भाजीपाला गोवा राज्यामध्ये पाठवला जातो. इतर भाजीपाला बेळगाव व परिसरातील खरेदीदार घेतात, अशी माहिती भाजी व्यापाऱ्यांनी दिली.

Advertisement
Tags :

.