For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सर्व्हर डाऊन समस्येमुळे पोस्टाची सेवा कोलमडली

11:18 AM Apr 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
सर्व्हर डाऊन समस्येमुळे पोस्टाची सेवा कोलमडली
Advertisement

ग्राहकांच्या रांगांमुळे कर्मचाऱ्यांचीही दमछाक : ज्येष्ठ नागरिकांना मन:स्ताप

Advertisement

बेळगाव : नवीन आर्थिक वर्षाच्या प्रारंभामुळे पोस्ट कार्यालयाच्या सेवा दोन दिवस ठप्प होत्या. त्यानंतर सर्व्हर डाऊनची समस्या निर्माण झाल्याने सर्व सेवा धीम्या गतीने सुरू होत्या. यामुळे शनिवारी बेळगावच्या मुख्य पोस्ट कार्यालयात ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. सर्वच काऊंटरवर रांगा लागल्याने कर्मचाऱ्यांचीही दमछाक झाली. मार्च एंडिंगनंतर 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात झाली. जुने सर्व व्यवहार बंद करून नवीन व्यवहार सुरू करण्यासाठी पोस्ट कार्यालयाने सोमवारी व मंगळवारी सर्व सेवा बंद ठेवल्या होत्या. तर बुधवारपासून देशात सर्वत्रच सर्व्हर डाऊनची समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे पोस्ट कार्यालयातील व्यवहार संथगतीने सुरू होते. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेपासून पोस्टात आरडी भरण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी होते. परंतु, सर्व्हर नसल्याने ग्राहक माघारी फिरत होते. वेळेत आरडी न भरल्यास दंड आकारला जातो. त्यामुळे शनिवारी आरडी भरण्यासाठी कॅम्प येथील मुख्य पोस्ट कार्यालयात ग्राहकांची गर्दी झाली होती. सोमवार दि. 8 पासूनच्या आठवड्यात सरकारी सुट्या आल्याने केवळ तीनच दिवस पोस्ट कार्यालय सुरू राहणार आहे. त्यामुळे आरडी व इतर व्यवहार करण्यासाठी पोस्ट कार्यालयात गर्दी झाली होती. ग्राहकांची संख्या वाढल्याने कर्मचाऱ्यांची दमछाक झाली. प्रत्येक काऊंटरवर रांगा लागल्याने ग्राहकांनीही संताप व्यक्त केला. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागला.

Advertisement
Advertisement
Tags :

.