एअर कार्गोबाबत पोस्ट कार्यालयाची विमानतळ प्राधिकरणाशी चर्चा
बेळगाव : बेळगाव विमानतळावरून पोस्ट विभागाची एअर कार्गो सुविधा करण्याबाबत नुकतीच पोस्ट विभागाच्या अधिकाऱ्यांनी विमानतळाला भेट दिली. भविष्यात व्यवसाय वृद्धीसाठी एअर कार्गोची सुविधा आवश्यक असल्याने याबाबत प्राथमिक चर्चा करण्यात आली. धारवाड येथील पोस्टल सर्व्हिसेसच्या संचालक व्ही. तारा यांच्या उपस्थितीत ही चर्चा झाली. खासगी कुरियर कंपन्यांशी स्पर्धा करत पोस्ट विभागाने आपली सेवा सुरू ठेवली आहे. देशातील महत्त्वाच्या शहरांना तात्काळ पार्सल सेवा मिळावी यासाठी कार्गो सुविधा सुरू करण्याचा विचारही केला जात आहे. या संदर्भातील प्राथमिक चर्चा गुरुवारी झाली. विमानतळाचे संचालक त्यागराजन यांच्यासोबत ही चर्चा झाली. पोस्टातून देण्यात आलेले पार्सल काही तासांमध्ये दुसऱ्या शहरात पोहोचण्यासाठी एअर कार्गोचा पर्याय विचारात घेतला जात आहे. दोन्ही विभागांमध्ये एअर कार्गो संदर्भातील मुद्यांवर चर्चा झाली. यावेळी बेळगाव पोस्ट विभागाचे अधीक्षक विजय वडोणी, व्यवस्थापक आय. आर. मुत्नाळी यांच्यासह विमानतळ अधिकारी उपस्थित होते.
जि. पं. सीईओंची भेट
स्थानिक गृहोद्योगांना मोठी बाजारपेठ मिळावी या उद्देशाने केंद्र सरकारच्या अवसर या योजनेतून विमानतळावर एक विभाग सुरू करण्यात आला आहे. याठिकाणी बेळगाव जिल्ह्यातील गृहोद्योगातून तयार झालेल्या वस्तू, खाद्यपदार्थ विक्री केले जात आहेत. याची पाहणी जि. पं. च्यावतीने करण्यात आली. सीईओ राहुल शिंदे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी या विभागाची पाहणी केली.