दफन केलेल्या श्रीयांशच्या मृतदेहाची केली उत्तरीय तपासणी
चिमगाव विषबाधा प्रकरण :
डीवायएसपींसह सरकारी अधिकारी यांची चिमगावात घटनास्थळी भेट
कोल्हापूर
चिमगाव (ता. कागल) येथे नातेवाईकांनी आणून दिलेला केक खाल्यानंतर विषबाधा होऊन दुर्दैवी मृत्यू झालेल्या श्रीयांशचा दफन केलेला मृतदेह आज उत्तरीय तपासणीसाठी पोलिसांनी दफनभूमीत जाऊन जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढला.
मुरगुड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी भुमरे व त्यांच्या पथकाने मृतदेहाची उत्तरीय तपासणी त्याच जागी पोलिस उपअधिक्षक सुजितकुमार क्षिरसागर, सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी करे, तहसिलदार अमरदिप वाकडे यांच्या उपस्थितीत केली. यावेळी , कृषी सहाय्यक अधिकारी संगीता शिंदे, तलाठी स्मीता शारबीद्रे, पोलिस पाटील किरण भाट, ग्रामसेवक बी. के. साठे, सरपंच दिपक आंगज, ग्रा. प. सदस्य हजर होते. दफन केलेला मृतदेह बाहेर काढताना ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, अन्न व प्रशासन खात्याच्या अन्न व औषध सहाय्यक आयुक्त प्रदीपा फावडे, सह आयुक्त यु. एस. लोहकरे, अन्नसुरक्षा अधिकारी आर. पी. पाटील या अधिक्रायांच्या पथकाने गावात केक खरेदी केलेल्या दुकानात प्रत्यक्ष जाऊन खाद्यपदार्थांविषयीची दुकानदाराकडून सखोल माहिती घेतली.
कु. श्रीयांश रणजीत आंगज (वय 4 वर्षे ) आणि कु. काव्या रणजित आंगज (वय 7 वर्षे ) चिमगावात रणजित आंगज यांचे घरी नातेवाईकांनी आणलेला केक त्यांचा चार वर्षाचा मुलगा श्रीयांश व सात वर्षाची मुलगी काव्या यांनी खाल्ला. त्यानंतर त्यांना उलट्या होवू लागल्या . तेंव्हा आंगज यांनी या दोन्ही मुलांना मुरगूडच्या खाजगी दवाखान्यात दाखवून औषधोपचार केले. पण मुलगा श्रीयांशची तब्येत आणखीत खालावल्याने त्याचा मंगळवारी सकाळी दुदैवी मृत्यू झाला. त्याच्यावर चिमगाव येथे अंत्यसंकार करण्यात आले.
मुलगी काव्या हिला अत्यावस्थ अवस्थेमध्ये कोल्हापूरच्या खाजगी दवाखान्यात नेल्यावर उपचारादरम्यान मंगळवारी सायंकाळच्या सुमारास तीचाही मृत्यू झाला. काव्याच्या मृत्यूची नोंद वसई चिल्ड्रन हॉस्पिटल कोल्हापूरचे डॉ. उदय पाटील यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात केली. मध्यरात्रीनंतर मुरगूड पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली. विषबाधेच्या घटनेची सर्व बाजूंनी चौकशी सुरू असल्याची माहिती सपोनि शिवाजी करे यांनी दिली.
विरुद्ध आहार सेवन
कांही तासांच्या अंतराने केक, दूध, मटन व अन्य अशा विरुध्द आहाराचे सेवन केल्याने पचनसंस्थेत बिघाड होऊन श्रीयांश आणि काव्या यांना विषबाधा झाली. या दोन्ही चिमूरड्यांची अल्पशी प्रतिकारशक्ती विषबाधा सहन करू शकली नाहीत त्यातूनदेखील त्यांचा पाठोपाठ मृत्यू झाला असण्याची शक्यताही घटनास्थळी बोलली जात होती.