मान्सूनोत्तर पावसाचा धुमाकूळ
चार दिवसांपासून मुसळधार : उसगावांत विद्यार्थ्यांचा बळी,पिकलेली शेती आली संकटात
पणजी : मान्सूनोत्तर पावसाने बुधवारी दिवसभर आणि रात्री फार मोठा धुमाकूळ घातल्याचे चित्र गुरुवारी सकाळी समोर आले आहे. मडगावात सव्वाचार इंच तर फोंडा आणि सांखळी येथे प्रत्येकी चार इंच पावसाची विक्रमी नोंद झाली. गोव्यात गेल्या 24 तासात सरासरी दोन इंच पावसाची नोंद झाली असून मान्सूनोत्तर पावसाने एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत 106 टक्के अतिरिक्त पाऊस झाला आहे. गोव्यात मान्सूनोत्तर पावसाचा जोर वाढत आहे. बुधवारी संपूर्ण गोव्यात दुपारनंतर सुरू झालेला पाऊस सायंकाळी उशिरापर्यंत चालूच होता. अनेक भागात बुधवारी सुरू झालेला पाऊस गुऊवारी सकाळी दहापर्यंत चालूच राहिला. सध्या पडणारा पाऊस हा साधारणत: 23 ते 24 ऑक्टोबरपर्यंत चालू राहण्याची जास्त शक्यता आहे.
शेतीसाठी मारक ठरतोय
सध्या पडणारा पाऊस पिकलेल्या शेतीसाठी मारक ठरत आहे. कित्येक भागात भातशेती पिकून तयार झालेली आहे आणि त्याचवेळी सतत पाऊस पडल्याने कणसे आडवी पडली आहेत. त्यातच सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे भाताला नव्याने अंकुर येण्याची शक्यता आहे. परिणामी या पावसामुळे शेतकरी सध्या चिंतातूर बनला आहे. दरम्यान हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार आज शुक्रवारी दुपारपासून मुसळधार पाऊस पडणार आहे. ढगांच्या गडगडाटासह, जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला आहे. गुऊवारी दुपारपर्यंत पाऊस चालूच होता. दुपारनंतर विश्रांती घेतलेल्या पावसाने सायंकाळी पुन्हा हजेरी लावली. पेडणे येथे सुरू झालेल्या दसरोत्सवाला देखील पावसाने हजेरी लावली.
मडगावात सवाधिक पाऊस
गेल्या 24 तासात सर्वाधिक सव्वाचार इंच पाऊस मडगाव येथे झाला. फोंडा सांखळी येथे प्रत्येकी एकेक इंच तर पेडणे येथे साडेतीन इंच पाऊस पडला. म्हापसा व जुने गोवे येथे प्रत्येकी दोन इंच झाला. वाळपाई येथे दीड इंच, तर पणजी येथे सव्वा इंच, दाबोळी, काणकोण, सांगे व मडगाव येथे प्रत्येकी पाऊण इंच पाऊस पडला. कॅपेमध्ये अर्धा इंच पाऊस झाला.
मान्सूनोत्तर नऊ इंच नोंद
उत्तर गोव्यात सरासरी तीन इंच तर दक्षिण गोव्यात सव्वा इंच पावसाची सरासरी नोंद झाली. यामुळे गेल्या 24 तासात सरासरी दोन इंच पाऊस झाला. मान्सूनोत्तर आतापर्यंत नऊ इंच पाऊस झाला. आगामी 24 तासात जोरदार वादळी वाऱ्यासह गोव्यात सर्वत्र पाऊस पडणार आहे. मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.