पश्चिम बंगालमध्ये होळीनंतर हिंसाचार
वृत्तसंस्था / कोलकाता
पश्चिम बंगालच्या बिरभूम जिल्ह्यात होळीनंतर दंगल पेटली आहे. या दंगलीत मोठ्या प्रमाणात हिंसाचार होऊन सरकारी मालमत्तेची हानी झाली आहे. राज्य सरकारने या जिल्ह्यात इंटरनेटवर 17 मार्चपर्यंत बंदी घातली असून दंगलग्रस्त भागात संचारबंदीही लागू केली आहे. राज्य सरकारला कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयश आले असून ते दंगलखोरांना पाठीशी घालत असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी केली. राज्य सरकारला परिस्थिती हाताळता आलेली नाही, कारण दंगलखोरांना सत्ताधारी नेत्यांचेच आशीर्वाद आहेत. केवळ बिरभूममध्येच नव्हे, तर राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये हिंदूंच्या सणांमध्ये अडथळा निर्माण केला जातो. त्यांना धाक दाखवून त्यांची मुस्कटदाबी केली जाते. मात्र, प्रशासनाची आणि समाजकंटकांची ही हडेलहप्पी दुर्लक्षित केली जाते. राज्य सरकारचा गृहविभाग आणि अन्य संबंधितांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्था परिस्थितीचा त्वरित आढावा घ्यावा, अशी मागणीही अधिकारी यांनी केली आहे.