जिल्ह्यात 218 ग्रा. पं. कार्यक्षेत्रांमध्ये पाणीटंचाईची शक्यता?
अद्याप टँकरद्वारे पुरवठा करण्याची वेळ आली नाही : जिल्हा पंचायतीची माहिती
प्रतिनिधी / बेळगाव
जिल्ह्यात 218 ग्रामपंचायत कायेत्रामध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषत: समाधानकारक बाब म्हणजे यंदा एकाही ग्रामपंचायत कार्यक्षेत्रांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली नाही. मात्र, खबरदारी म्हणून 88 कूपनलिकांचा सर्व्हे करण्यात आला आहे. येत्या काळात टंचाई निर्माण झाल्यास या कूपनलिकांचा वापर केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा पंचायतीने दिली.
गतवर्षी जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आला होता. दरम्यान, एप्रिल आणि मे महिन्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते. मात्र, यंदा पावसाळ्यात झालेल्या समाधानकारक पावसाने अद्याप पाणीसमस्या निर्माण झाली नाही. शिवाय अधूनमधून वळिवाचा पाऊस झाल्याने पाणीपातळी टिकून आहे. मात्र, जिल्हा पंचायतीने पाणी समस्या निर्माण होऊ नये, यासाठी योग्य पावले उचलली आहेत. ज्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रांमध्ये पाणीटंचाई निर्माण होणार आहे, त्या ठिकाणी कूपनलिकांचा सर्व्हे करण्यात आला आहे.
समस्या उद्भवल्यास या कूपनलिका भाडेतत्त्वावर घेऊन पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे. सरकारी आणि खासगी कूपनलिकांचा सर्व्हे केला आहे. अशा कूपनलिका अडचणीच्या वेळी उपयोगी ठरणार आहेत. जिल्ह्यात 500 ग्रामपंचायती आहेत. मात्र, एकाही ग्राम पंचायतींमध्ये अद्याप पाण्याची समस्या उद्भवली नाही. शिवाय टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा करण्याची गरजही भासली नाही, असा दावाही जिल्हा पंचायतीने केला आहे.
जिल्ह्यातील काही ग्राम पंचायतींमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. मात्र, त्या ठिकाणी गावपातळीवर पाण्याचा पुरवठा केला जात आहे. काही ठिकाणी सामाजिक संस्थांकडून टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा होत आहे. मात्र, अद्याप जिल्हा प्रशासनाकडून पाण्याचा पुरवठा करण्याची वेळ आली नाही. शिवाय मे महिन्यातील पंधरवडा संपला आहे. शिवाय वळीव आणि मान्सूनपूर्व पावसालाही सुरुवात होणार आहे. त्यामुळे यंदा पाणीसमस्या निर्माण होणार नसल्याची शक्यता जिल्हा पंचायतीने वर्तविली आहे.
खबरदारी म्हणून कूपनलिकांचा सर्व्हे
जिल्ह्यात 218 ग्रामपंचायत कार्यक्षेत्रांमध्ये पाणीसमस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप या ग्राम पंचायतींमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आलेली नाही. शिवाय खबरदारी म्हणून कूपनलिका सर्व्हेचे काम करण्यात आले आहे. यंदा जलस्रोतांना समाधानकारक पाणी टिकून आहे.
-राहुल शिंदे (जि. पं. सीईओ)
पाणी समस्या निर्माण होण्याची शक्यता असलेल्या जिल्ह्यातील ग्रामपंचायती
| तालुके | ग्रामपंचायती |
| बेळगाव | 14 |
| बैलहोंगल | 14 |
| कित्तूर | 8 |
| खानापूर | 12 |
| रामदुर्ग | 7 |
| सौंदत्ती | 2 |
| अथणी | 31 |
| कागवाड | 10 |
| चिकोडी | 41 |
| निपाणी | 16 |
| गोकाक | 22 |
| मुडलगी | 8 |
| हुक्केरी | 7 |
| रायबाग | 26 |
| एकूण | 218 |