महाराष्ट्र | कोकणकोल्हापूरअहमदनगरमुंबई /पुणेसांगलीसातारासोलापूर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पाच-दोन फॉर्म्युल्यानुसार स्थायी समितींच्या निवडीची शक्यता

11:49 AM Jun 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सत्ताधारी-विरोधी गटातील नगरसेवकांची चर्चा

Advertisement

बेळगाव : महानगरपालिकेतील स्थायी समितींची निवडणूक 2 जुलै रोजी जाहीर झाल्यानंतर मोर्चेबांधणीला जोरदार सुरुवात झाली आहे. मागीलवेळेप्रमाणे यावेळीही पाच-दोन या फॉर्म्युल्यानुसार स्थायी समितींची निवड करण्याचे निश्चित झाले असून त्याला विरोधी गटानेही सहमती दिल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. त्यामुळे यावेळीही सर्व स्थायी समितींची निवड बिनविरोध होण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेतील स्थायी समितींची मुदत संपली. त्यामुळे प्रादेशिक आयुक्तांनी 2 जुलै रोजी निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महानगरपालिकेतील कौन्सिल विभागाने तयारी सुरू केली आहे. सर्व नगरसेवकांना नोटीस देण्यात आल्या आहेत. त्यानंतर हालचाली गतिमान झाल्या. सत्ताधारी भाजप गटाने, तसेच विरोधी गटाने ही निवडणूक बिनविरोध करण्याबाबत चर्चा केली आहे. विरोधी गटाच्या नगरसेवकांनी आम्हाला किमान तीन जागा तरी प्रत्येक स्थायी समितीमध्ये द्याव्यात, अशी मागणी केली होती.

Advertisement

मात्र सत्ताधारी गटाने पाच-दोन या फॉर्म्युल्यानुसारच स्थायी समित्यांची निवड केली जाईल, त्याला तुमची संमती असेल तर सांगा, अन्यथा निवडणूक लढवू, असा इशारा सत्ताधारी भाजपने दिला. निवडणूक झाली तरी विरोधी गटालाच फटका बसण्याची भीती आहे. त्यामुळे त्यांनी भाजपने दिलेल्या पाच-दोन फॉर्म्युल्याला मान्यता दिली आहे. महानगरपालिकेमध्ये आरोग्य व शिक्षण, अर्थ व कर, सार्वजनिक बांधकाम आणि लेखा स्थायी समिती आहेत. त्या प्रत्येक स्थायी समितीमध्ये सत्ताधारी गटाचे पाच नगरसेवक, तसेच विरोधी गटाचे दोन नगरसेवक अशा एकूण सात जणांची निवड केली जाणार आहे. त्यानंतर सत्ताधारी गटाचेच पुन्हा चेअरमन निवडले जाणार आहेत. त्यामुळे यावेळीही सत्ताधारीच सर्व स्थायी समितीचे चेअरमन राहणार हे निश्चित झाले आहे. एकूणच निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता अधिक आहे.

स्थायी समिती निवडणुकीची कौन्सिल विभागाकडून तयारी : निवडणुकीसाठी अधिकाऱ्यांची नेमणूक

मनपा कौन्सिल विभागाकडून दि. 2 जुलै रोजी होणाऱ्या स्थायी समितींच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. सर्व नगरसेवकांना नोटीस पोहोचविण्याचे काम पूर्ण झाले आहे. याचबरोबर निवडणुकीसाठी अधिकाऱ्यांचीही नेमणूक करण्यात आली आहे. कौन्सिल विभागाने इतर विभागातील विविध अधिकाऱ्यांना कामाबाबतची नोटीस पोहोचविली आहे.महानगरपालिकेतील चार स्थायी समितींची निवडणूक घेण्याबाबत प्रादेशिक आयुक्तांकडून आदेश आला असून मनपा कौन्सिल विभाग निवडणुकीच्या कामाला लागला आहे. या निवडणुकीमध्ये नगरसेवकांसह खासदार, आमदार व विधान परिषद सदस्य असे एकूण 65 सदस्य आहेत. त्या सर्वांना निवडणुकीबाबत नोटीस पोहोचविल्या आहेत.

या चार स्थायी समितींसाठी वेगवेगळ्या रंगाचे बॅलेट पेपरदेखील तयार करण्यात आले आहेत.निवडणूक घेण्याचे निश्चित झाले तर मनपाच्या सभागृहात निवडणूक घेतली जाणार आहे. याचबरोबर या सर्वांचे मतदान नोंदवून घेतले जाणार आहे. प्रत्येक स्थायी समितीसाठी सात नगरसेवकांची निवड केली जाणार आहे. त्यानंतर संबंधित नगरसेवक चेअरमनची निवड करण्याची प्रक्रियाही पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे ही किचकट निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी कौन्सिल विभागाने तयारी दर्शविली आहे. बिनविरोध निवड झाली तर कौन्सिल विभागाला दिलासा मिळणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article