पावसात कर्ले-बेळवट्टी गावचा संपर्क तुटण्याची शक्यता
संपर्क रस्ता बनला धोकादायक : रस्त्यावर भगदाड, प्रशासनाचे दुर्लक्ष, नागरिकांतून तीव्र संताप : डांबरीकरण करण्याची जोरदार मागणी
वार्ताहर/किणये
कर्ले ते बेळवट्टी संपर्क रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. तसेच रस्त्याच्या बाजुला काही ठिकाणी भले मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात कर्ले ते बेळवट्टी गावचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे. यामुळे वाहनधारक व स्थानिक नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी प्रशासनामार्फत विविध योजना राबविल्या जातात. अलिकडच्या काळात रस्त्यांसाठी विशेष निधी मंजूर करून गावागावातील मुख्य व संपर्क रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र कर्ले ते बेळवट्टी या संपर्क रस्त्यासाठी प्रशासनाकडून निधी मंजूर होत नाही आहे का? असा सवाल कर्ले व बेळवट्टी गावातील नागरिकांतून व्यक्त करण्यात येत आहे.
सुमारे साडेपाच किलो मीटर अंतराचा संपर्क रस्ता आहे. या रस्त्याच्या डांबरीकरणाकडे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या दहा वर्षापासून दुर्लक्ष केले आहे. 10 वर्षे हा रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र सध्याच्या डांबरीकरणाला मुहूर्त अद्याप सापडलेला नाही, असेच म्हणावे लागेल. बेळवट्टी, कर्ले, जानेवाडी, कावळेवाडी, बिजगर्णी, राकसकोप, इनामबडस, बहाद्दरवाडी, किणये, नावगे, बेळगुंदी, सोनोली, यळेबैल आदी गावातील वाहनधारकांसाठी हा महत्त्वाचा संपर्क स्ता आहे. मात्र सध्या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत. तसेच या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. रस्त्याचा बहुतांशी भाग पूर्णपणे उखडून गेला आहे. रस्त्यावरून सध्या बैलगाडी जाणेही मुश्कील बनले आहे. मग या रस्त्यावरून वाहनधारकांनी वाहतूक करायची कशी?
2019 साली अतिवृष्टी झाली. यावेळी रस्त्यावर पाणी आले होते. मुसळधार पावसात रस्त्याचा काही भाग वाहून गेला होता. त्या त्या ठिकाणी मोठ मोठे भगदाड पडलेले आहेत. त्याची अद्यापही दुरुस्ती झाली नाही. बेळवट्टी गावानजीक छोटासा नाला आहे या नाल्यावर पूल आहे. तो पूलही 2019 साली वाहून गेला होता. त्या ठिकाणीही रस्त्यावर मोठे भगदाड पडलेले आहे. रात्रीच्यावेळी या रस्त्यावरील वाहतूक धोकादायक ठरू लागली आहे. बेळवट्टी, इनाम बडस, बाकनूर, आदी गावातील तरुण उद्यमबाग, मच्छे व नावगे औद्योगिक वसाहतीमध्ये विविध कारखान्यामध्ये कामाला जातात. या कामगारांना कर्ले, बेळगाव, चोर्ला मार्गे उद्यमबाग व मच्छे येथे जाण्यासाठी कर्ले-बेळवट्टी संपर्क रस्ताच उपयोगी पडतो आहे. या रस्त्यावरून उद्यमबागला येण्यासाठी अंतर कमी लागते. सध्या रस्ता खराब असल्याने बेळगुंदी कॅम्पमार्गे या भागातील कामगारांना कारखान्यांमध्ये कामाला यावे लागत आहे. यामुळे विनाकारण कामगारांना जादाचे अंतर जावे लागत आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी या रस्त्याच्या आजूबाजूला अधिक प्रमाणात आहेत. त्यामुळे या संपर्क रस्त्यावरून शेतकऱ्यांना रोज शेतावर ये-जा करावी लागते. खड्डेमय रस्त्यामुळे शेतकरी वर्गही अक्षरश: वैतागलेला आहे. गैरसोय टाळण्यासाठी सदर रस्त्याचे त्वरित डांबरीकरण करावे अशी जोरदार मागणी होत आहे.
रस्ता हरवला खड्ड्यात
कर्ले ते बेळवट्टी हा संपर्क रस्ता गेल्या दहा वर्षापासून दुर्लक्षित आहे. रस्त्यावर सध्या इतके मोठे खड्डे पडलेले आहेत की, त्यामधून वाट काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्ता पूर्णपणे खड्ड्यांमध्ये हरवलेला आहे. काही दुचाकीस्वार पडून किरकोळ जखमी झाल्याचे प्रकार घडले आहेत. या रस्त्यावरून विद्यार्थी, शेतकरी, दूध वाहतूक करणारे टेम्पो आणि कामगार वर्गाची वर्दळ अधिक प्रमाणात असते. पण हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे धोकादायक बनला आहे. अधिक पाऊस झाल्यास रस्ता बंद होण्याच्या मार्गावर आहे. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याची पाहणी करून रस्ता डांबरीकरणासाठी प्रयत्न करावेत.
- नरसिंग देसाई, कर्ले