Sangli Rain Update : संभाव्य पूरस्थितीला तोंड देण्यास सांगलीकर सज्ज, नेत्यांसह, अधिकाऱ्यांची बैठक
यंदा मान्सून वेळेत आल्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर कार्यरत
सांगली : लोकप्रतिनिधी, संस्था, संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांच्या सूचनांचा विचार करून संभाव्य पूरपरिस्थितीला तोंड देण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज असल्याची माहिती आयुक्त सत्यम गांधी यांनी दिली. मनपा आपत्ती व्यवस्थापनअंतर्गत पूरपरिस्थिती बाबत नियोजन करण्यासाठी पालिकेच्या मंगलधाम येथील कार्यालयात लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली.
बैठकीला खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार इद्रिस नायकवडी यांनी उपस्थित राहत पालिकेस पुराच्या नियोजनाबाबत सूचना केल्या. मान्सूनपूर्व व आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत यावर्षी प्रशासन, नागरिकांचा, सामाजिक संस्था यांच्या सहभागातून चांगले नियोजन केले आहे, असे आयुक्तांनी सांगितले.
अवकाळीशिवाय यंदा मान्सून वेळेत आल्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर कार्यरत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कृष्णानदीला आलेले महापूर आणि महापालिका क्षेत्रातील नागरी वस्त्यांमध्ये शिरलेले पुराचे पाणी त्यानंतर करायची व्यवस्था याबाबत प्रशासनाने बराच गोष्टींचा अभ्यास करून काही निकष काढले आहेत. त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन कार्यप्रणाली तयार केली आहे.
पूर कालावधीमध्ये नियोजनासाठी कमी कालावधीत नियोजन करण्यात आले आहे. पुरावेळी लोकांत भितीचे वातावरण निर्माण होते, परिणामी प्रशासनावर ताण पडतो ही बाब लक्षात घेऊन पूरबाधित क्षेत्रात पाहणी आणि संबधितांना सूचना वेळेत दिल्या आहेत. सर्व परिस्थितीवर लक्ष केंद्रित केले आहे. यावेळी मान्सूनपूर्व तयारी सुरू करून सर्व बाबीची नोंद घेऊन नियोजन केले आहे.
कोणत्याही परिस्थितीस सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. आपत्ती मित्र अँप, आपत्ती मित्र कार्यकर्ते, निवाराकेंद्र, स्थलांतरीत नागरिकांच्या सोयीसुविधा, नालेसफाई इत्यादी बाबत नियोजन केले आहे. जेणेकरून पुढील काळात नियोजन नुसार कामकाज करताना प्रशासनावर ताण येणार नाही, याची दक्षता घेतली आहे.
सामाजिक कार्यकर्ते, संस्था यांच्याशी संवाद साधून यावेळी त्यांच्या सहभागातून नदी पात्रातील व पुरबाधित होणाऱ्या वस्त्या मधील नागरिकांची जनजागृतीकडे प्राध्यान असणार आहे. पूर आल्यानंतर लोकांमध्ये निर्माण होणारी भीती आणि त्यानंतर होणारी धावपळ कमी करण्याकडे कल वाढला आहे.
आपत्ती व्यवस्थापन कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवणे त्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करून दिली जाणार आहे. नदीकाठावरील नागरिकांना आवश्यक सूचना, प्रशिक्षण आणि आपल्या जीविताचे, मालमतेचे रक्षणासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रसार माध्यमाव्दारे अद्ययावत माहिती दिली जाणार आहे.
सुरक्षा किट तयार ठेवण्याच्या सूचना
मागील अनुभव पाहता पूर बाधित क्षेत्रातील नागरिकांसाठी सुरक्षित किट तयार ठेवण्याची सूचना देण्यात येत आहे. त्यामध्ये आवश्यक सर्व मौल्यवान वस्तू साहित्य कागदपत्रे, औषध इत्यादी बाबीचा समावेश असावा, त्याच्या उपयोग नागरिकांना यापूर्वी झालेला आहे. यावेळी देखील त्याबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यात येत आहे. पूर ओसरल्यावर करायच्या कामाबाबत टप्याटप्याने साथीचे रोग अन्य आजार उद्भवतात त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे.